सरनाईकच नाही तर ९० टक्के नेते नाराज, त्यामुळे सेना-भाजप एकत्र आल्यास नवल वाटू नये – बावनकुळे

Devendra Fadnavis and Uddhav Thackeray
सरनाईकच नाही तर ९० टक्के नेते नाराज, त्यामुळे सेना-भाजप एकत्र आल्यास नवल वाटू नये

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या पत्रानंतर शिवसेना-भाजप युतीसंदर्भात चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांना भाजपचे नेते प्रतिसाद देत आहेत. भाजपच्या अनेक नेत्यांनी युतीसंदर्भात सकारात्मक प्रतिसाद देत आहेत. दरम्यान, आता माजी उर्जामंत्री आणि भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं विधान केलं आहे. शिवसेना आणि भाजप एकत्र आल्यास नवल वाटू नये, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलं आहे.

चंद्रशेख बावनकुळे यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला. प्रताप सरनाईकंच नाही, तर शिवसेनेचे ९० टक्के आमदार, खासदार सरकारवर नाराज आहेत. सरकारमध्ये फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आमदारांचीच कामं होत आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादी आपला पक्ष मजबूत करत आहेत, शिवसेना कमजोर होत आहे. यामुळे शिवसेनेचे खासदार आणि आमदार या सरकारवर नाराज आहेत. वीज कापल्याने शिवसेना आमदारांवर लोकांचा रोष कायम आहे. त्यामुळे शिवसेना-भाजप पुन्हा एकत्र आले तर नवल वाटायला नको, असं चंद्रशेख बावनकुळे म्हणाले.

शिवसैनिकांच्या व्यथा मांडाव्यात – चंद्रकांत पाटील

शरद पवारांच्या पे रोलवर राहून उठसूट पवारांच्या समर्थनार्थ बोलण्यापेक्षा सर्वसामान्य शिवसैनिकाचं काय मनोगत ते तुम्हा मांडा. शिवसैनिकांचं मनोगत असं आहे की, आम्हाला हिंदुत्व पाहिजे. हिंदुत्वाच्या संरक्षणासाठी आम्ही आहोत. स्वर्गिय बाळासाहेब ठाकरे यांनी तो संदेश दिला आहे. महत्त्वाचं म्हणजे जी युती होती त्यात आम्ही समाधानी होतो. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाणं हे अनैसर्गिक आहे, हे सर्वसामान्य शिवसैनिकाचं मत मांडत नाहीत, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.