मुंबई : मराठा समाजाने ओबीसीमधून आरक्षणाची मागणी केल्यानंतर आता त्यांच्या या मागणीला ओबीसीतील बहुतांश जातींकडून विरोध करण्यात आला आहे. ओबीसी आरक्षण वाचविण्यासाठी आणि मराठा समाजाने केलेल्या मागणीला विरोध करण्यासाठी शुक्रवारी (ता. 17 नोव्हेंबर) जालना जिल्ह्यातील अंबड येछे महाएल्गार सभा पार पडली. सरकारमधील मंत्री छगन भुजबळ यांच्या नेतृत्त्वात ही सभा पार पडली. या सभेला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार राजेश राठो, बबनराव तायवाडे, प्रकाश शेंडगे व अन्य ओबीसी नेते उपस्थित होते. त्यामुळे आता राज्यात ओबीसी वि. मराठा असा वाद पेटण्याची शक्यता आहे. शुक्रवारी छगन भुजबळ यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणामुळे दोन जातींमध्ये वाद निर्माण होऊ शकतो, असा आरोप करण्यात येत आहे. परंतु, या मुद्द्यावरून आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी महत्त्वाचे आवाहन केले आहे. जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्राला तोडू नका, असे राऊतांकडून सांगण्यात आले आहे. (Don’t break Maharashtra in caste politics, Sanjay Raut appeals)
हेही वाचा – अंजली दमानियांच्या आरोपांवर समीर भुजबळांचा खुलासा, म्हणाले – “हा त्यांचा मीडिया स्टंट”
पत्रकार परिषदेत बोलताना संजय राऊत म्हणाले की, मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद असा सुरू राहिला तर भविष्याच्या धर्माच्या नावावर नाही तर जातीच्या नावावर दंगली होतील. शिवसेनेच्या रुपाने बाळासाहेब ठाकरेंनी मराठी लोकांची जी एकजूट घडवली त्या एकजुटीची वज्रमूठ सैल होईल. त्यामुळे महाराष्ट्रांच्या शत्रूंचे फावेल, ही आमची भीती आहे. त्यामुळे कोणीही जातीय दंगली भडकविण्याची भाषा करू नये. महाराष्ट्र एकदा धार्मिक दंगलीमध्ये होरपळून निघाला आहे. महाराष्ट्र आता जाती, उपजाती आणि पोटजातीमध्ये फाटून त्या दंगली घडू नये. विष कालवू नये. हा महाराष्ट्र आता एकसंध राहावा. फक्त भौगोलिक नाही तर सामाजिक दृष्टीने सुद्धा महाराष्ट्र एकच राहावा, ही शिवसेनेची भूमिका असल्याची माहिती संजय राऊत यांच्याकडून देण्यात आली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन करताना एक मंत्र दिला होता. कोणत्याही जातीपातीचा विचार न करता सर्व जातीतील वाद काढून मराठी माणसाची भक्कम एकजूट उभी राहावी. त्यामुळे आज पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या त्या मंत्रानुसार महाराष्ट्राने पुढे जावे, अशी परिस्थिती निर्माण झाली. राजकारण्यांनी त्यांचे पाडापाडीचे राजकारण करावे. पण या जातीपातीच्या राजकारणात महाराष्ट्र तोडू नका. तुमची पाडापाडी तुम्हाला लखलाभ होऊ, पण जातीच्या आधारावर पाडापाडी करणार असाल तर महाराष्ट्र हा महाराष्ट्र राहणार नाही, असेही संजय राऊत यांच्याकडून सांगण्यात आले आहे.