फडणवीस आणि अजित दादांचा पुन्हा योगायोग

don't celebrate birthday appel bjp leader devendra fadnavis and ajit pawar
फडवणीस आणि अजित दादांचा पुन्हा योगायोग

माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच २२ जुलै रोजी आहे. असा या दोघांचा पुन्हा एकदा योगायोग जुळून आला असून दोघांनीही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच फडणवीसांनी कार्यकर्त्यांना सेवाकार्यात योगदान देण्यात आवाहन केले असून अजित पवारांनी वाढदिवसाचा खर्च टाळून तो निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचे आवाहन केले आहे.

फडणवीसांकडून असे केले आवाहन

पक्षाचे कोणतेही नेते/कार्यकर्ते होर्डिंग, बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून/ टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत, असे आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचे भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुळकर्णी यांनी कळविले आहे. तसेच होर्डिंग, बॅनर, जाहिराती असे कुणी केल्यास त्याची पक्षातर्फे गंभीर दखल घेतली जाईल. त्यामुळे या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. यंदा कोरोनामुळे आपण सारेच अनेक संकटांना तोंड देत आहोत. भाजपातर्फे समाजातील विविध घटकांसाठी राज्यभर मोठ्या प्रमाणात सेवाकार्य केले जाते आहे. त्यामुळे ज्या कुणाला योगदान द्यायचे आहे, त्यांनी सेवाकार्यात योगदान द्यावे, असे आवाहन सुद्धा पक्षातर्फे करण्यात येत आहे.

अजित पवारांकडून असे केले आवाहन

तसेच अजित पवार म्हणाले की, ‘कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी वाढदिवसानिमित्त कोणत्याही प्रकारचे जाहीर कार्यक्रम आयोजित करू नयेत. गर्दी जमवू नये, प्रत्यक्ष भेटीसाठी येणे टाळावे, पुष्पगुच्छ पाठवू नयेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा दूरध्वनीवरुन किंवा डिजिटल स्वरुपात द्याव्यात. सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करुन महाराष्ट्राला कोरोनामुक्त करण्याच्या लढाईत योगदान द्यावे. मान्यताप्राप्त यंत्रणांच्या सहकार्याने, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करून रक्तदान शिबिरांसारखे लोकोपयोगी कार्यक्रम आयोजित करावेत.’