मुंबई : सध्या राज्यातील राजकारण मराठा, धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून पेटलेले आहे. अशातच आता राज्य सरकारने आरक्षणाला बगल देत कंत्राटी पद्धतीने पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत. मात्र त्याचवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, असे स्पष्टीकरण दिले होते. याचपार्श्वभूमीवर विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे. स्वतःला मोठा नेता म्हणून घेत असाल तर आता हे पाप तरी तुम्ही करू नका. अजित पवार खोटं बोलून तरुणांना फसवत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे. (Vijay Wadettivar anger over Ajit Pawar statement contract recruitment)
राज्य सरकारने 9 खाजगी कंपन्यांना कंत्राट देऊन नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला असून त्यासंदर्भात अध्यादेशही काढला आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात विजय वडेट्टीवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधताना म्हटले की, हे नालायक सरकार राज्यातील तरुणाई उद्धवस्त करायला निघाले आहे. मुलांनो या सरकारविरोधात रस्त्यावर उतरा, आंदोलन करा. जोपर्यंत हे सरकार अध्यादेश मागे घेत नाहीत तोपर्यंत मागे हटू नका, असं आवाहन विजय वडेट्टीवार यांनी राज्यातील तरुणांना केलं आहे. त्याचवेळी अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला आहे.
आता हे पाप तरी करू नका…
विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्वतःला मोठा नेता म्हणाविणारे अजित पवार खोटं बोलून तरुणांची फसवणूक करत आहेत. त्यांनी कंत्राटी नोकरभरतीसंदर्भात दिशाभूल करणारे वक्तव्य करू नका. महाराष्ट्रातील तरुणांना फसवू नका. तुम्ही पक्ष फोडून गेलात, तो तुमच्या विषय होता. मात्र आता तरुणांना उद्धवस्त करण्याचे पाप तरी करू नका, अशा शब्दात विजय वडेट्टीवार यांनी अजित पवार कंत्राटी नोकरभरतीसंदर्भात सुनावलं आहे.
राज्यातील तरुणांचे भविष्य उद्धवस्त होईल
कंत्राटी नोकरभरतीचा निर्णय लागू करताना हा निर्णय आधीच्या सरकारचा होता, असे सध्याच्या सरकारने म्हटलं आहे. परंतु आमच्यावेळी हा निर्णय केवळ पंधरा प्रवर्गासाठी होता. त्यामध्ये डाटा ऑपरेटर संगणक चालक यांचा समावेश होता. मात्र सरकारने त्यामध्ये बदल करून शिपाई ते इंजिनियर या सर्वच पदांचा समावेश केला आहे. त्यामुळे पन्नास हजार वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांचे दहा हजार रुपये थेट या कंपनीकडे जातील. उद्या ही कंपनी 20 हजार रुपये वेतनावर तरुणांची नियुक्ती करेल. त्यामुळे राज्यातील तरुणांचे भविष्य उद्धवस्त होईल, असा आरोपही वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा – तुम्ही इतर धर्मांवर बोलून दाखवा; सनातन धर्माच्या वादावर फडणवीसांचं आव्हान
अजित पवार काय म्हणाले?
कंत्राटी नोकरभरती अध्यादेश शासनाने 6 सप्टेंबर 2023 रोजी लागू केला आहे. यानंतर विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर अजित पवारांनी स्पष्टीकरण दिलं होतं की, राज्याच्या काही विभागांमध्ये तातडीने पदभरती करणे आवश्यक आहे. त्यामुळे राज्य सरकारने विविध विभागांमध्ये कंत्राटी स्वरूपात पदभरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कंत्राटी पदभरतीचा निर्णय हा कायमस्वरूपी नसून, तो तात्पुरत्या स्वरूपाचा आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.