मुंबई : मध्य प्रदेशात भाजपा सरकार आल्यास मोफत रामलल्लाचे दर्शन देऊ, असे आश्वासन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहे. त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी टीका करताना अमित शहा यांचे हे वक्तव्य घृणास्पद, धक्कादायक असल्याचे म्हटले आहे. त्यावर रामभक्तीला हीन लेखण्याचा वावदूकपणा करू नका, असा पलटवार भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे.
हेही वाचा – निधी वाटपावरून सत्तेत संगीत खुर्चीचा खेळ सुरू; मुंबईच्या जागेबाबत ठाकरे गटाने केले भाष्य
मध्य प्रदेशात 17 नोव्हेंबर 2023 रोजी मतदान होणार आहे आणि 3 डिसेंबर 2023 रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे येथे प्रचार शिगेला पोहोचला आहे. सत्ताधारी भाजपा आणि विरोधक काँग्रेस यांच्यात खरी लढत आहे. गुनाच्या राघोगडमध्ये सोमवारी एका प्रचारसभेला अमित शाह यांनी सभेला संबोधित करताना काँग्रेसवर टीका केली. मंदिराचे बांधकाम रोखण्याचा प्रयत्न करणे आणि भारतीय संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप त्यांनी काँग्रेसवर केला. तुम्ही 3 डिसेंबरला मध्य प्रदेशात भाजपाचे सरकार स्थापन करा, हे सरकार तुम्हाला प्रभू रामलल्लाचे मोफत दर्शन घेण्यासाठी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
अहो सर्वज्ञानी….@rautsanjay61
ज्या अयोध्यानगरीत रामलल्ला पुन्हा दिमाखात विराजमान होणार आहेत, त्या पुण्यधामाचं आम्ही मध्यप्रदेशच काय, सगळ्या भारतालाच दर्शन घडवून आणणार आहोत…
तुमचंही तिथं स्वागतच आहे
पण, आमचं आदरातिथ्य तुम्हाला रूचणार नाही कारण तुम्ही तुमची सेवा काँग्रेसचरणी…— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 14, 2023
त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. निवडणूक प्रचारत भाजपा नेत्यांकडून अशी वक्तव्ये होत आहेत. भाजपा रामलल्लांची मालक झाली आहे का? की रामलल्लांनी भाजपाला नियुक्त केले आहे? रामलल्ला सगळ्यांचे आहेत. त्यांच्यावर मालकी हक्क सांगणारे तुम्ही कोण? रामलल्लाचे मंदिर उभे करण्यात भाजपाचे योगदान नाही. या देशात असंख्य रामभक्त, त्यांचा त्याग आणि बलिदानातून राम मंदिर उभे राहिले आहे. त्यामुळे अमित शहा यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत आणि जनतेची माफी मागावी, अशी मागमी संजय राऊत यांनी केली. हा फार गंभीर मुद्दा आहे. निवडणूक आयोग खरंच जिवंत असेल तर, त्यांनी या मुद्यावर भाजपावर कारवाई करायला हवी, असे आव्हानही त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले.
हेही वाचा – मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर कदम-कीर्तिकरांच्या वादावर अखेर पडदा; पण खासगी आयुष्यावरील टीकेचे समर्थन
यावर भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी याला प्रत्युत्तर दिले आहे. ज्या अयोध्यानगरीत रामलल्ला पुन्हा दिमाखात विराजमान होणार आहेत, त्या पुण्यधामाचे आम्ही मध्य प्रदेशच काय, सगळ्या भारतालाच दर्शन घडवून आणणार आहोत. तुमचेही तिथे स्वागतच आहे. पण, आमचे आदरातिथ्य तुम्हाला रूचणार नाही, कारण तुम्ही तुमची सेवा काँग्रेसचरणी अर्पण केली आहे, असे त्यांनी संजय राऊत यांना सुनावले आहे.
प्रभू श्रीरामाला ज्यांनी बेघर केले त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसता आणि आम्हाला शिरजोरीने विचारता, रामाचा सातबारा भाजपाच्या नावावर आहे काय? भाजपाच्या नावावर असेलच तर ती रामभक्ती आहे. सोबतीला रामावर प्रेम करणारी विराट जनशक्ती आहे. श्रीराम, भाजपा आणि भारतीय जनता हा भक्तिभावाचा अपूर्व संगम आहे त्या रामभक्तीला हीन लेखण्याचा वावदूकपणा करू नका, असा सल्लाही त्यांनी दिला.