माझ्या फंदात पडू नका…, अजित पवारांच्या टिप्पणीवरून नारायण राणेंचा इशारा

मुंबई : भाजपा नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी उपहासात्मक टिप्पणी केली आहे. नारायण राणे हे मुंबईतील निवडणुकीत एका महिलेकडून पराभूत झाल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्याचा व्हिडीओ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्विटरवरून शेअर केला. त्यामुळे वाद निर्माण झाला असून माझ्या फंदात पडू नका, असा इशारा नारायण राणे यांनी अजित पवार यांना दिला आहे.

‘नारायण राणेंनी शिवसेना फोडली. सगळे पडले की नाही? राणेसाहेब तर दोनदा पडले. एकदा तिथे कोकणात पडले आणि एकदा मुंबईत वांद्रे का कुठे उभे होते, तिथेही पडले. तिथे तर महिलेने पाडलं.. हां… बाईनं पाडलं बाईनं…,’ अशी उपहासात्मक टीका अजित पवार यांनी या व्हिडीओत केली आहे. ‘दादा म्हणजे कमाल आहे. कमाल की चीज! नेता असाच असतो एकदम मोकळा ढाकळा! सहज सोप्या भाषेत थेट संदेश!,’ अशी टिप्पणी संजय राऊत यांनी त्यावर केली आहे.

यावरून नारायण राणेंचे पुत्र आणि भाजपा आमदार नितेश राणे यांनी काल, शुक्रवारी अजित पवारांवर पलटवार केला आहे. ‘राणे साहेब देशाचे केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचले. आपण काय फक्त भावी मुख्यमंत्रीच्या बॅनरच्या स्पर्धेत अडकलेले दिसत आहात,’ अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी ट्विटरवरून दिली आहे.

तर, आज, शनिवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी देखील याबाबत संताप व्यक्त केला. अजित पवार यांना बारामतीच्या बाहेर कितपत राजकारण कळते माहीत नाही, असे सांगत, माझ्या फंदात पडू नका, नाहीत पुण्याला येऊन बारा वाजवेन, असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे.

माझे कार्यक्षेत्र पहिल्यांदा मुंबई होते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला कोकणात पाठवले. तिकडून सलग सहावेळा निवडून आलो. काँग्रेसमध्ये असताना तत्कालीन काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मला वांद्रे येथून निवडणूक लढविण्यास सांगितले. मी माझ्या मतदारसंघात उभा राहिलो नव्हतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.