घर उत्तर महाराष्ट्र नको ओवाळणी, नको खाऊ.. जुनी पेन्शन हवी भाऊ...; मुख्यमंत्र्यांना पाठवल्या 2 हजार...

नको ओवाळणी, नको खाऊ.. जुनी पेन्शन हवी भाऊ…; मुख्यमंत्र्यांना पाठवल्या 2 हजार राख्या

Subscribe

नाशिकमधून दोन हजार राख्या पाठवत भगिनींची मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

नाशिक : रक्षाबंधनचे औचित्य साधत महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि राज्यातील सर्व महिला पेन्शनधारक जुन्या पेन्शन योजनेसाठी पुन्हा एकवटल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच दोघा उपमुख्यमंत्र्यांना २८ ऑगस्ट ते सहा सप्टेंबर या कालावधीत राख्या पाठविण्यात येत असून नको ओवाळणी,नको खाऊ.. जुनीच पेन्शन हवी भाऊ..! अशी साद त्यांना घालण्यात येत आहे.

जुनी पेन्शनकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील महाराष्ट्र जुनी पेन्शन संघटनेच्या महिला पदाधिकारी आणि राज्यातील सर्व महिला पेन्शन फायटर रक्षाबंधनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना 28 ऑगस्टपासून ओपीएस राखी अभियानांतर्गत राख्या पाठवत आहेत. हे अभियान 6 सप्टेंबर पर्यंत राबवले जाईल. या माध्यमातून राज्यातील महिला कर्मचारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना ओवाळणी म्हणून जुनी पेन्शन लागू करण्याची मागणी करीत आहेत. हे आगळे वेगळे अभियान महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या माध्यमातून राबवले जात आहे. नाशिक जिल्ह्यातील महिला कर्मचार्‍यांनी देखील या अभियानात सहभाग नोंदवत मुख्यमंत्र्यांना 1800 हून अधिक राख्या पाठवण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर २००५ नंतर नियुक्त, राज्यातील शासकीय, निमशासकीय कर्मचार्‍यांची जुनी पेन्शन योजना बंद करण्यात आली असून डीसीपीएस योजना आणण्यात आली आहे.

- Advertisement -

जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी राज्यातील कर्मचारी मोठ्या संख्येने वेगवेगळ्या स्वरुपातील आंदोलनांच्या माध्यमातून लढा देत आहेत. परंतु, राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे लढ्याला अद्याप यश आलेले नाही. त्यामुळे यंदा रक्षाबंधनाचे औचित्य साधत मुख्यमंत्र्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे साकडे राज्यातील महिला निवृत्ती वेतनधारक करीत आहेत. रक्षाबंधनच्या निमित्ताने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्यातील कर्मचार्‍यांच्या वृद्धापकाळाची काठी म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय घ्यावा, हीच खरी आमच्यासाठी ओवाळणी ठरेल, असे राज्यातील महिला कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. या उपक्रमाची संकल्पना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या दीपिका एरंडे यांनी मांडली असता संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर तसेच राज्य पदाधिकारी गोविंद उगले, आशुतोष चौधरी, संजय सोनार यांनी उपक्रम राबविण्याबाबत मार्गदर्शन केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर राज्यातील आपल्या लहानग्या कर्मचारी भगिनींना खाली हात पाठविणार नाहीत. पेन्शन कर्मचार्‍यांचा संवैधानिक अधिकार व म्हातारपणाची काठी आहे. तो अधिकार शिंदे हे पुन्हा मिळवून देतील अशी आशा आहे. : शितल खैरनार, जि.प शाळा, चंदनपुरी, मालेगाव

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेकडून रक्षाबंधनानिमित्त राज्यातील विविध विभागातील एनपीएस धारक महिला कर्मचारी राख्या पाठवित आहेत. सेवानिवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित होण्यासाठी जुनी पेन्शन योजना मुख्यमंत्री देतील, अशी लाखो बहिणींची आशा आहे. : मनीषा मडावी, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -