दुहेरी हत्याकांड: कुख्यात गुंड पाप्याच्या मोबाईलमधील ५६ फोटोे ठरले कळीचे

शिर्डीत २०११ मध्ये दुहेरी हत्यांकाडाच्या तपासात कोणतेही धागेदोरे नसताना परिस्थितीजन्य पुराव्यांवरुन एक-एक कडी जोडली. कुख्यात गुंड पाप्या शेखच्या मोबाईलमध्ये मिळालेले मारहाणीचे ५६ फोटो हे या तपासात महत्वपूर्ण ठरले. साक्षीदार तयार करणेही सोपे नव्हते. पण त्यांना धीर देत न्यायालयात साक्ष द्यायला तयार केले. शिक्षा कमी करण्याची हमी देत एका आरोपीला साक्षीदार केले. आरोपीच्या सांगण्यानुसार पुरावे, साक्षीदार, कपडे, काठ्या, रक्ताचे नमुने गोळा करुन न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. त्यामुळे पाप्या शेखसह १२ आरोपींना जन्मठेप व एक कोटी ३४ लाखांच्या दंडाची शिक्षा झाल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विगागाचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली. या प्रकरणातील उत्कृष्ट तपासाची केंद्रीय गृहमंत्रालयाने दखल घेत सुनील कडासने यांना युनियन होम मिनिस्टर पदक जाहीर केले आहे. त्यानिमित्त कडासने यांची विशेष मुलाखत !

प्रश्न : बालपण ते पोलीस अधीक्षक प्रवास कसा आहे?

उत्तर : वडील जिल्हा शल्यचिकित्सक असल्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नागपूर, बुलढाणा व नाशिकमध्ये झाले. बारावी नाशिकमधील आरवायके व पदवीचे शिक्षण बीवायके महाविद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी एबीएचे शिक्षण बिटको महाविद्यालयातून पूर्ण केले. जातीय सलोखा कायम टिकवून ठेवायाचा, पोलीस आणि नागरिकांमध्ये सदैव संवाद रहावा, अशी खूणगाठ मनाशी बाळगून १९९७ मध्ये एमपीएससी पास झालो. पहिली पोस्टींग त्यांना ठाणे येथील डीवायएसपी म्हणून मिळाले. त्यानंतर ते मलकापूर (बुलढाणा), मनमाड येथे नोकरी केली. श्रीरामपूरमध्ये ते अपर पोलीस अधीक्षक म्हणून रूजू झाले होते. जातीय सलोखा राखण्यासाठी मालेगावी नियुक्ती करावी, अशी विनंती राज्यपालांकडे केली होती. त्यानुसार त्यांची मालेगावी नियुक्ती झाली. हिंदू आणि मुस्लिम बांधवांमध्ये जातीय सलोखा निर्माण होण्यासाठी ऊर्दू व अरेबी भाषा शिकून घेतली. विशेष म्हणजे, नाशिकमध्ये ऊर्दू भाषेचा डिप्लोमा केला. त्यात महाराष्ट्रात ते पहिले आले. २०१६ मध्ये महाराष्ट्र शासनातर्फे राज्यपालांच्या हस्ते महात्मा गांधी शांतता पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रश्न : प्रशासकीय कामाबद्दल अनुभव कसा आहे?

स्वभाव, भाषण कौशल्य आणि लोकसंपर्कामुळे हजारो लोक जोडत गेले. राज्यात नोकरीच्या ठिकाणी जातीय सलोखा ठेवण्यात यशस्वी झालो. लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिकार्‍यासारखे न वागता विविध भाषा शिकून लोकांमध्ये गेलो. परिणामी, गरजू लोकांना आधार व न्याय मिळाल्याने स्थानिक नागरिक स्वत:हून संवाद साधू लागले. अहमदनगर जिल्ह्यात बनावट दूध कसे तयार केले जाते, याचा भांडाफोड केला होता. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांना प्रात्यक्षिक करुनही दाखवले होते. नगर जिल्ह्यात बनावट दूध अड्ड्यांवर छापे टाकत उद्ध्वस्त केले.

प्रश्न : आपले आदर्श कोण आहेत?

छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा राणाप्रताप व वडील आदर्श आहेत. वडील सिव्हिल सर्जल असताना ते स्वत: रुग्णालय परिसर स्वच्छ ठेवायचे. गरजूंना स्वत: मदत करायचे. त्यातून भावी आयुष्यात पोलीस अधिकारी बनून लोकसेवा करण्यासह कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याचा निश्चय केला होता.

प्रश्न : आपले छंद कोणते आहेत?

पोलीस अधिकारी म्हणून स्थानिकांशी संवाद साधण्यासाठी भाषा शिकायचे ठरवले. मराठी, हिंदी, इंग्रजी, ऊर्दू, अरेबी, पंजाबी, जपानी, जर्मन भाषा शिकलो, भाषेमुळे लोकांच्या अडीअडचणी समजतात. त्यांना मदत करता येते.

दुहेरी खुनाचा तपास कसा केला?

कुख्यात गुंड पाप्या शेखची शिर्डीमध्ये मोठी दहशत होती. १४ जून २०११ रोजी खंडणीतील रकमेसाठी शिर्डीत प्रवीण गोंदकर आणि रचित पटणी यांना पाप्यासह त्याच्या साथीदारांनी राहाता येथील हॉटेलमध्ये बोलावले. या ठिकाणी त्यांचे अपहरण करुन अज्ञास्थळी नेले. रात्रभर आरोपींनी दोघांना बेदम मारहाण करत अनैसर्गिक कृत्यास भाग पाडून त्यांचे नग्न अवस्थेतील फोटो काढले. दोघांना दारु पाजत मारहाण केली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या या दुहेरी खून खटल्यात तो फरारी झाला. आरोपींनी काढलेल्या मारहाणीच्या व्हिडीओत सर्वांनी चेहरे झाकले होते. पण एका आरोपीच्या सांगण्यानुसार सर्वांचे कपडे आणि व्हिडीओत दिसणारे कपडे जुळवत आरोपी शोधले. साक्षीदारांना शेवटपर्यंत धीर दिला. दारु खरेदी केलेल्या दुकानदारास शोधले. घटनेच्या दिवशी पाप्याने मृत तरुणाला कॉलही केला होता. मृत तरुणाच्या वडिलांनी घटनास्थळी बेल्ट, पाकीट ओळखले, त्यातून गुन्ह्याचा उलगडा झाला.