मोठी बातमी! डॉ. अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याच्या तयारीत, चर्चांना उधाण

अमोल कोल्हे गेल्या तीन वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. मतदारसंघातीलच राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी ही बाब शरद पवारांच्याही कानावर घातली आहे

Amol Kolhe says this election is for to select MP not for PM

अभिनेते आणि राष्ट्रवादीचे पुण्यातील शिरूर मतदारसंघातील खासदार अमोल कोल्हे लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देण्याच्या तयारीत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळालीय. राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंतन शिबिरातही अमोल कोल्हे हे अनुपस्थित होते, त्यामुळे अनेक प्रकारच्या शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. तसेच अमोल कोल्हे लवकरच मोठा निर्णय घेऊ शकतात, अशीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

विशेष म्हणजे अमोल कोल्हे गेल्या तीन वर्षांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात वेळ देत नसल्याच्या तक्रारी आहेत. मतदारसंघातीलच राष्ट्रवादीच्या काही वरिष्ठ नेत्यांनी ही बाब शरद पवारांच्याही कानावर घातली आहे. अमोल कोल्हे हे खासदार असले तरीही ते आधी सेलिब्रिटी आहेत, त्यामुळे त्यांच्या भोवती एक वेगळंच वलय आहे. परंतु तेच आता त्यांच्या अडचणीचं कारण ठरू शकतं. कारण विरोधकांबरोबरच स्वपक्षीयांकडूनही अमोल कोल्हेंसमोर आव्हान उभे केले जात आहे.

दुसरीकडे गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादीनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केलीय, त्यात शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, सुप्रिया सुळे या नेत्यांची नावं आहेत. परंतु अमोल कोल्हेंचं नाव वगळण्यात आलं आहे. त्यामुळे अमोल कोल्हे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याच्या बातम्यांनी जोर पकडलाय. आता या सगळ्या बातम्यांवरून स्वतः अमोल कोल्हेंनी स्पष्टीकरण देत त्या बातम्यांना पूर्णविराम दिलाय. राष्ट्रवादीमध्ये नाराज असल्याचे कोणतेही कारण नाही. नाराज असतो तर थेट शरद पवार, सुप्रिया सुळे किंवा अजित पवार यांच्याशी बोललो असतो. त्यामुळे मी पक्षात नाराज नसून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहणार असल्याचा अमोल कोल्हेंनी खुलासा केला आहे.

तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घेतलेल्या भेटीसंदर्भातही त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. शिवप्रताप गरुडझेप या माझ्या चित्रपटाचे स्क्रीनिंग हे दिल्लीतील बड्या नेत्यांच्या आशीर्वादाने व्हावे, अशी आपली मनीषा होती. त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची वेळ मागितली होती. दिल्लीतील राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांबद्दल माहिती व्हावी हा त्यामागे स्वच्छ हेतू होता. त्या भेटीची शरद पवार, सुप्रिया सुळे, अजित पवार यांना माहिती दिली होती, अशीही पुष्टी त्यांनी जोडली आहे.


हेही वाचाः वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून मविआत फूट पडू शकते, संजय राऊतांचं मोठं वक्तव्य