घरमहाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी समारंभ लांबणीवर अपुऱ्या नियोजनाने कार्यक्रम झाला रद्द

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचा पायाभरणी समारंभ लांबणीवर अपुऱ्या नियोजनाने कार्यक्रम झाला रद्द

Subscribe

दादरच्या इंदू मिलमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभाला अपुर्‍या नियोजनाचा फटका बसला आणि शेवटी हा कार्यक्रम रद्द करण्याची वेळ सरकारवर आली. नियंत्रणावरून निर्माण झालेला वाद टाळण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पायाभरणीचा समारंभ पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या पायाभरणी समारंभाला मोजक्याच मान्यवरांना निमंत्रित करण्यात आल्याने त्यावर आक्षेप घेतला जात होता. त्याची तातडीने दखल घेत उद्धव ठाकरे यांनी हा कार्यक्रम पुढे ढकलण्याचे निर्देश मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला दिले. हा कार्यक्रम आता नवी तारीख निश्चित करून पूर्ण नियोजनाअंती होणार आहे.

‘इंदू मिल येथे महामानव डॉ. बाबासाहेबांचे भव्य स्मारक उभे करण्याची सर्वांची इच्छा आहे. यामध्ये कुठलाही पक्ष-संघटना असा भेदभाव असूच शकत नाही. सर्वांच्या सहभागाने पुढील काही दिवसात इंदू मिल येथील पायाभरणी समारंभ होणार आहे. यात कुणीही राजकारण करू नये’, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

- Advertisement -

राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर एमएमआरडीएने पुतळ्याच्या सुधारित संरचनेच्या दृष्टीने सर्व तयारी पूर्ण केली आणि त्यानुसार पायाभरणी कार्यक्रम करण्याचे नियोजन केले होते. त्यासाठी आजची तारीख निश्चित केली होती. परंतु, अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमात सर्वांचा सहभाग असणे गरजेचे आहे, हे मी लक्षात आणून दिले आहे आणि त्यामुळेच ठरविल्याप्रमाणे एक चांगला कार्यक्रम सर्व आवश्यक मान्यवरांना निमंत्रित करून पुढील काही दिवसांत करावा, असे निर्देश मी दिले आहेत, असेही ठाकरे म्हणाले. २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या भूमिपूजनाचा भव्य कार्यक्रम पार पडला होता. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्यासह विविध मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते.

आजच्या नियोजित कार्यक्रमाला केवळ १६ मान्यवरांनाच निमंत्रित करण्यात आले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्यासह मंत्रिमंडळातीलही काही सदस्यांना आमंत्रण नव्हते. कोरोनाचा संसर्ग लक्षात घेऊन तसे करण्यात आल्याचे सांगितले जात असले तरी त्यावरून नाराजीचा सूर होता. याची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी आजचा कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.

- Advertisement -

महाविकास आघाडीचा समन्वय चुकला

इंदू मिलच्या पायाभरणीच्या कार्यक्रमात झालेल्या निमंत्रणाच्या घोळामुळे आणि नाराजांच्या उफाळून आलेल्या वादामुळे आजचा कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. महाविकास आघाडीतील कॅबिनेट मंत्री, विऱोधी पक्षनेते, आंबेडकरी संघटना तसेच माध्यमांनाही याबाबतची माहिती आणि निमंत्रण देण्यात आले नव्हते. सुरुवातीला फक्त १६ जणांनाच याबाबतचे निमंत्रण देण्यात आले होते, अशी चर्चा होती.

कोरोनाचे संकट लक्षात घेता खूपच मर्यादित अशा व्यक्तींना इंदू मिलच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाणे निमंत्रण पाठविण्यात आले होते. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण म्हणजे एमएमआरडीएने माध्यमांना पाठवलेल्या निमंत्रणात फक्त महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना, आमदार, महापौर आणि पालकमंत्र्यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, मुंबईचे पालकमंत्री अस्मम शेख, महापौर किशोरीताई पेडणेकर, आमदार सदा सरवणकर यांना निमंत्रित करण्यात आले होते.

पण निमंत्रणावर आनंदराज आंबेडकर, प्रकाश आंबेडकर तसेच विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही या कार्यक्रमाच्या आयोजनाबाबत टीका केली आहे. राज्यात कोरोनाचे संकट सुरू असताना इतक्या घाईने हा कार्यक्रम उरकण्याची काय गरज होती असा सवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू आनंदराज आंबेडकर यांनी केला आहे. एमएमआरडीएच्या कामावर टीका केल्यानेच त्यांच्याकडून सुरुवातीला मला निमंत्रण पाठवण्यात आले नाही. पण माध्यमांनी हा विषय उचलल्यावर मात्र निमंत्रण पाठवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तर वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू प्रकाश आंबेडकरांनी निमंत्रण कुणाला द्यायचे हा मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे असे भाष्य केले.

एमएमआरडीए या संपूर्ण प्रकल्पात फक्त प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठीचे काम करत आहे. एमएमआरडीएने माध्यमांना दुपारी निमंत्रण पाठवले. पण या निमंत्रणाच्या संपूर्ण प्रकरणावर भाष्य करणार नाही असे एमएमआरडीएच्या वतीने सांगण्यात आले. मुख्यमंत्री कार्यालयातून हे निमंत्रण पाठवण्यात आल्याची चर्चा होती.

माझा पुतळ्याला विरोध -प्रकाश आंबेडकर

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पायाभरणीचा कार्यक्रम महाविकास आघाडी सरकारला ऐनवेळी रद्द करावा लागला. या कार्यक्रमासाठी मोजून सोळा जणांना बोलवण्यात आले होते. त्यामुळे अनेक नेते नाराज होते. प्रकाश आंबेडकरांनाही या कार्यक्रमाचे निमंत्रण देण्यात आले नव्हते. या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. इंदू मिलमध्ये स्मारकाऐवजी लोकोपयोगी वास्तू उभारा, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी यावेळी व्यक्त केले आहे. माझा पुतळा उभारण्याला विरोध आहे असे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले. पुतळा उभारण्याऐवजी एक बौद्धीक विचार केंद्र निर्माण व्हावे असे आंबेडकर म्हणाले. तसंच इंदू मिलमधील स्मारकाच्या कार्यक्रमाला जाण्यात मला रस नाही असेही त्यांनी म्हटले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -