घरताज्या घडामोडीइंग्रजी भाषा मराठीपेक्षा अधिक समृद्ध

इंग्रजी भाषा मराठीपेक्षा अधिक समृद्ध

Subscribe

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी व्यक्त केलं परखड मत

सामाजिक घडामोडीचे संपूर्ण प्रतिबिंब साहित्यात उमटतं. एखादी भाषा पुष्कळ विकसित असेल तर समाजाचे बहुतेक पैलू त्यात उमटतात. परंतु काही महत्वाचे पैलू भाषेकडून उपेक्षिले गेले तर त्याबाबतीत तिला असमृद्ध समजले पाहिजे. अशा मानदंडाद्वारे आपण असे म्हणू शकतो की इंग्रजी भाषा मराठी भाषेपेक्षा अधिक समृद्ध आहे, अशा शब्दांत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांनी परखड मत मांडलं.

नाशिकच्या कुसुमाग्रज नगरीत आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्याला डॉ. नारळीकर प्रकृती अस्वास्थ्यामुळे उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, त्यांनी पाठवलेलं भाषण यावेळी वाचून दाखवण्यात आलं. या भाषणात डॉ. नारळीकर म्हणाले की, सर्वप्रथम आजच्या महत्वाच्या प्रसंगी मला माझे विचार मांडायला संधी दिलीत याबद्दल आपणा सर्वांचे आभार मानतो. तसेच, माझे भाषण आपल्या पसंतीस उतरले नाही तर त्याबाबत आधीच दिलगिरी व्यक्त करतो.

- Advertisement -

डॉ. नारळीकर यांच्या भाषणातील सारांश… 

मराठीचे अपूर्णत्व सर्वात जास्त जर कुठे जाणवत असेल तर ते विज्ञान-साहित्यात. विसावे शतक हे विज्ञानाचे शतक म्हटल्यास चूक ठरणार नाही. आइन्स्टाइनचा सापेक्षतावाद आणि प्लांक-आइन्स्टाइन-बोर यांचा पुंजवाद हे दोन महत्वाचे मूलभूत सिद्धांत या शतकाच्या पहिल्या १५ वर्षात भौतिकशास्त्राला मिळाले. अमूर्त गणिताच्या अनेक नव्या शाखा या शतकात चालू झाल्या. वर्षानुवर्षे न सुटू शकणारे प्रश्न चुटकीसरशी सोडवणारी गणकयंत्रे या शतकाच्या उत्तरार्धात निघाली. विश्वाचे विराट दर्शन आणि अणूच्या अंतरंगाचे सूक्ष्म दर्शन मानवाला आज पहायला मिळत आहे. जीवशास्त्राच्या मुळाशी असलेला डी.एन.ए. रेणू शास्त्रज्ञांना सुमारे सहा दशकांपूर्वी गवसला. विज्ञानाची ही गरुडझेप तंत्रज्ञानाच्या रूपाने मानवी जीवन अधिक प्रगत, विकसित करायला कारणीभूत ठरली.

विज्ञान-साहित्य म्हणजे काय?

वैज्ञानिक संशोधनाचे प्रबंध किंवा एखाद्या विषयातील पोटशाखेत जागतिक स्तरावरील संशोधनाचा आढावा यांना मी विज्ञान-साहित्यात धरत नाही. परंतु एखादा वैज्ञानिक शोध जनसामान्यांपर्यंत पोचवण्यासाठी लिहिलेले लेख मी विज्ञान-साहित्यात धरेन. अर्थात एखाद्या वैज्ञानिक कल्पनेला मुळाशी धरून त्याभोवती रचलेली कथा किंवा कादंबरी मी विज्ञान-साहित्य म्हणून मानली तर त्याबद्दल कोणाचा आक्षेप असू नये.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -