घरक्राइमhoney trapped: डॉ. प्रदीप कुरुलकर ईमेलद्वारे पाकिस्तानच्या संपर्कात; एटीएसची कोर्टात माहिती

honey trapped: डॉ. प्रदीप कुरुलकर ईमेलद्वारे पाकिस्तानच्या संपर्कात; एटीएसची कोर्टात माहिती

Subscribe

 

पुणेः शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्या ईमेलमध्ये आढळलेले संशयास्पद मेल हे पाकिस्तानचे असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे, अशी माहिती दहशतवाद विरोधी पथकाने पुणे विशेष सत्र न्यायालयात दिली. त्याची नोंद करुन घेत न्यायालयाने डॉ. कुरुलकर यांना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

- Advertisement -

डॉ. कुरुलकर यांच्या सोशल मीडियातून फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स् शेअर झाल्या आहेत. त्यांच्या मोबाईल आणि अन्य डिव्हाइसमधून डिलिट झालेला डेटा फॉरेन्सिक लॅबकडून पुन्हा प्राप्त झाला आहे. या डेटाचा तपशील घेण्याचे काम सुरु आहे. परदेश दौऱ्यावर असताना डॉ. कुरुलकर सहा देशात गेले होते. या दौऱ्यांची सर्व माहिती डॉ. कुरुलकर यांच्याकडून घ्यायची आहे. डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये डॉ. कुरुलकर यांना भेटायला आलेल्या महिला कोण होत्या, याचा तपास करायचा आहे. त्यामुळे त्यांच्या कोठडीत वाढ करावी, अशी मागणी एटीएसने पुणे विशेष न्यायालयात केली. ती मागणी न्यायालयाने मान्य केली.

DRDO या संस्थेत काम करणारे डॉ. प्रदीप कुरूलकर हे नकळतपणे हनी ट्रॅप प्रकरणात अडकले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर महिलांची छायाचित्रे वापरून या अधिकाऱ्याला पाकिस्तानने आपल्या जाळ्यात ओढले. यानंतर तो पाकिस्तानातील गुप्तचर अधिकाऱ्यांच्या संपर्कात आला. ते गेल्या सहा महिन्यांपासून पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थांच्या संपर्कात होते, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

- Advertisement -

ते पाकिस्तान गुप्तचर संस्थेतील एका महिलेच्या संपर्कात देखील होते, अशी माहिती समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी व्हॉट्सअप मेसेज, व्हॉट्सअप कॉलिंग आणि व्हॉट्सअपच्या व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून पाकिस्तानच्या गुप्तचर अधिकाऱ्यांना माहिती पुरवली असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यापासून डीआरडीओच्या दक्षता विभागाकडून आणि गुप्तचर पथकांकडून डॉ. कुरूलकर यांच्यावर नजर ठेवून होते. अखेरीस याबाबतची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मिळाल्यानंतर आणि DRDO मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तक्रारीनंतर ATSने अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत आरोपी डॉ. कुरूलकर यांना अटक केली.

डॉ. प्रदीप कुरूलकर हे नोव्हेंबर महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. मात्र, नकळतपणे ते पाकिस्तानमधील गुप्तचर संस्थांच्या संपर्कात आल्याचे तपास यंत्रणांना आतापर्यंतच्या तपासात आढळून आले आहे. तर डॉ. प्रदीप कुरुलकर यांनी खरचं कोणती संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवली आहे का? याचा एटीएसकडून अधिक तपास केला जात आहे.

 

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -