घरठाणेलम्पी आजारामुळे ठाणे जिल्ह्यात ४३ जनावरं बाधित; टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा,...

लम्पी आजारामुळे ठाणे जिल्ह्यात ४३ जनावरं बाधित; टोल फ्री क्रमांकावर संपर्क करा, झेडपीचे आवाहन

Subscribe

ठाणे : लम्पी आजार जनावरांपासून माणसांना होण्याची शक्यता अजिबात नसून, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या सेवनाने मनुष्यांला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. जिल्ह्यातील पशुपालकांनी घाबरून जाऊ नये. जनावरांना लम्पी आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास अथवा लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी अथवा १९६२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी केले आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, अंबरनाथ या तीन तालुक्यांमध्ये लंपी रोगाचे १६ केंद्र बिंदू असून आतापर्यंत एकूण ४३ जनावरे बाधित झालेली आढळून आलेली आहेत.

ठाणे जिल्ह्यातील लम्पी त्वचारोगसंबंधीची माहिती देण्यासाठी जिल्हा परिषदेत शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. सातपुते यांनी ही माहिती दिली. यावेळी पशुसंवर्धन उपआयुक्त प्रशांत कांबळे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी समीर तोंडणकर उपस्थित होते. डॉ. सातपुते यांनी सांगितले की, राज्यात जनावरांवर लम्पी त्वचा रोग या आजाराचा शिरकाव झाला आहे. ठाणे जिल्ह्यात या आजाराचा फैलाव होऊ नये याकरीता जिल्ह्यातील सर्व बाजार समितीमध्ये गुरांचा बाजार बंद करण्यात आला असून जनावरांच्या शर्यती व प्रदर्शन बंद करण्यात आले आहेत.

- Advertisement -

लम्पी त्वचा रोगामुळे पशुपालकांनी घाबरू नये. या रोगाची लक्षणे आढळल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी किंवा राज्य शासनाच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा. तातडीने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. बाधित जनावरांवरील उपचार मोफत करण्यात येणार आहेत. ग्रामीण भागातील ६५ पशुवैद्यकीय दवाखाने व त्यातील पशुवैद्यकीय अधिकारी तत्पर आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात आवश्यक सर्व औषधे व लस साठा उपलब्ध असून सर्व क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी, यंत्रणा सतर्क आहेत. लम्पी सदृश्य लक्षण असलेले जनावर निदर्शनास आल्यास नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा अथवा १९६२ या हेल्पलाईनवर संपर्क करावा, असे आवाहन सातपुते यांनी यावेळी केले.

लंपी त्वचा रोगाचे संक्रमण होऊ नये याकरिता बाधित भागातील ५ किलोमीटर परिघातील परिसरात लसीकरण करण्यात येत आहे. जिल्ह्यात ५ शीघ्र कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बाधित क्षेत्रातील ५ किलोमीटर परिघातील परिक्षेत्रात एकूण १० हजार ५७७ जनावरे आहेत. सदर क्षेत्रातील ८ हजार ४५० जनावरांना लसीकरण करण्यात आलेले आहे. उर्वरित सर्व जनावरांचे लसीकरण करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झालेल्या परिसरात सर्व रोग नमुने, बाधित जनावरांना उपचार, रोग प्रतिबंधक लसीकरण याकरिता कोणत्याही प्रकारचे सेवाशुल्क आकारण्यात येत नसून सर्व सेवा मोफत देण्यात येत आहेत. कोणी पैसे घेताना आढळ्यास त्वरीत संपर्क करावा असेही सातपुते यांनी यावेळी सांगितले


हेही वाचा : रत्नागिरीच्या समुद्रात अडकलेल्या १९ जणांची तटरक्षक दलाच्या जवानांकडून सुटका


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -