पक्ष निलंबनाच्या कारवाईनंतर सुधीर तांबेंची पहिली प्रतिक्रिया…

राज्यात विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोर धरला आहे. यावेळी नाशिक पदवीधर मतदार संघातील उमेदवारीवरून मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला आहे. डॉ. सुधीर तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली होती. पण ऐनवेळी त्यांनी फॉर्म न भरता निवडणुकीतून माघारी घेतली आणि मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेसने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. याबाबत काँग्रेसने एक पत्रही जारी केलं आहे. पक्ष निलंबनाच्या कारवाईनंतर डॉ. सुधीर तांबे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

सुधीर तांबे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, पक्षाकडून चौकशी केली जात आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही. तोपर्यंत मी या विषयावर काहीही भाष्य करणार नाही. भाजप पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा अनेक चालू आहेत, पण त्यात काहीही तथ्य नाही. भाजपचा पाठिंबा आम्ही मागितला नाही, मग ते कसे काय पाठिंबा देतील, असं सुधीर तांबे म्हणाले.

नाशिकमध्ये सुधीर तांबे आणि सत्यजीत तांबे यांचा प्रचार सुरू आहे. सुधीर तांबे अनेकांच्या गाठीभेटी घेत आहेत. काय घडामोडी होतात यापेक्षा निवडणूक महत्त्वाची आहे. तसेच आम्ही येत्या १८ जानेवारीला भूमिका स्पष्ट करणार असल्याचं सुधीर तांबे यांनी म्हटलं आहे.

महाविकास आघाडीच्या नेत्यांची व्हिडीओ कान्फरन्सिंगद्वारे आज बैठक पार पडणार आहे. नाशिकमधील निवडणुकीबाबत यासंदर्भात रणनीती ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी जयंत पाटील, नाना पटोले, सुभाष देसाई, अभिजित वंजारी या बैठकीत सहभाग घेणार आहेत.


हेही वाचा : डॉ. सुधीर तांबेंवर काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई, उमेदवारीप्रकरणी चौकशी होणार