रोबोटमुळे उल्हासनगरातील ड्रेनेज सफाईला गती

उल्हासनगर । उल्हासनगर महानगरपालिकेकडे टाटा ट्रस्टचा तिसरा रोबोट आला असून त्यामुळे शहरातील तुंबलेल्या ड्रेनेज सफाईला गती मिळणार आहे. असे पालिका आयुक्त अजीज शेख यांच्या हस्ते या तिसर्‍या रोबोटचे उद्घाटन करण्यात आले आहे.

उल्हासनगरातच्या अनेक भागात भुयारी गटारांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. दाट वस्तीचे शहर असल्याने लोकांनी नाल्यांवर घरे इमारती उभारल्या आहेत. त्यामुळे कामगारांना सफाईकाम करताना जीव धोक्यात घालावा लागत आहे.
गेल्या वर्षी रिजन्सी भवन निर्माण चे संचालक महेश अग्रवाल,उद्धव रुपचंदानी,अनिल बठीजा आणि टाटा ट्रस्टच्या वतीने उल्हासनगर महागरपालिकेला ड्रेनेज सफाईसाठी दोन रोबोट दिले होते. या दोन्ही रोबोटने पावणेदोन हजार वेळा शहरातील ड्रेनेजची सफाई केली गेली आहे. आता पुन्हा एकदा टाटा ट्रस्टने त्यांच्या सीएसआर मधून पालिकेला रोबोट दिला आहे. नेताजी चौकातील पाणी पुरवठा विभागाच्या विभागीय कार्यालयाच्या आवारात या रोबोटचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी पालिका आयुक्त अजीज शेख,अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, डॉ.करूणा जुईकर, मुख्यालय उपायुक्त अशोक नाईकवाडे,पाणी पुरवठा प्रभारी अभियंता राजेश वानखेडे,बी.एस.पाटील,टाटा ट्रस्टच्या महिला अधिकारी आँड्रीला रॉय,सहायक आयुक्त गणेश शिंपी,अच्युत सासे,पाणी पुरवठा विभागातील बी.एस.पाटील उपस्थित होते. उल्हासनगरात मुख्य मार्गांमध्ये किंवा बाजूला जवळपास तीन हजारपेक्षा अधिक अंडरग्राऊंड ड्रेनेज आहेत. ते साफ करण्यासाठी पालिकेकडे गाडी होती. लांब पाईप टाकून ड्रेनेजमधील तुंबलेली घाण काढण्यात येत होती. त्यात दगड किंवा मोठ्या वस्तू अडकल्यास त्या काढण्याकरिता सफाई कर्मचार्‍यांना ड्रेनेजमध्ये उतरण्याची वेळ येत होती.

रोबोट आल्याने सफाई कर्मचार्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या रोबोटची उंची माणसापेक्षा उंच असून त्याला स्वयंचलित दोन हात आहेत. हा रोबोट ड्रेनेजमध्ये उतरतो आणि त्याच्या स्वयंचलित हातांनी घाण, जड वस्तू बाहेर टाकतो.तीन रोबोट झाल्याने तुंबलेल्या ड्रेनेज सफाईला गती मिळणार असून ड्रेनेज तुंबल्याच्या येणार्‍या तक्रारीचे तात्काळ निराकरण केले जाणार असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, पाणी पुरवठा प्रभारी अभियंता राजेश वानखेडे यांनी दिली.