अमली पदार्थ बाळगल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा जावई समीर खान यांचा विशेष न्यायालयाने काही दिवसांपूर्वी जामीन मंजूर केला आणि त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली. पण एनसीबीने आपल्यावर दाखल केलेला गुन्हा खोटा, बनावट असल्यामुळे आपल्यावरील गुन्हा रद्द करण्याची मागणी समीर खान यांनी उच्च न्यायालयात केली आहे.
गुन्हा रद्द करण्यासाठी करण्यात आलेल्या उच्च न्यायालयातील याचिकेमध्ये न्यायवैद्यक अहवालाचा दाखला दिला आहे. या न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील रासायनिक विश्लेषण अहवालामध्ये समीर खान यांच्याकडे सापडलेले प्रतिबंधित पदार्थ अमली पदार्थ नव्हते. त्यामुळे अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याअंतर्गत कोणताही गुन्हा होऊ शकत नसल्यामुळे एनसीबीने आपल्यावरील गुन्हा रद्द करावा, असे याचिकेत म्हटले आहे.
दरम्यान न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून देण्यात आलेल्या १८ पैकी फक्त १ नमुन्यांमध्ये गांजा सापडलेला होता आणि तो ७.५ ग्रॅमचा होता. म्हणून हस्तगत आलेले अमली पदार्थ तस्करीसाठी नव्हते असा दावा याचिकेत समीर खान यांनी केला आहे. कारण एनसीबीने हस्तगत आलेले अमली पदार्थ तस्करीसाठी होते असा दावा केला होता. मात्र हा दावा चुकीचा आहे, असे समीर खान यांनी याचिकेत म्हटले आहे.