दारूच्या नशेत पत्नीचा खून; म्हणे, ‘पाय घसरुन पडली’

नाशिक : मद्यधुंद अवस्थेत पतीने बेदम मारहाण करत पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना सोमवारी (दि.२०) औद्योगिक वसाहतीतील शिवाजीनगर भागात घडली. खूनानंतर पत्नी पाय घसरून पडल्याचा बनाव केला होता. मात्र, शवविच्छेदन अहवालात खून झाल्याचे उघड होताच पोलिसांनी पतीला बेड्या ठोकल्या. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीनू सोमनाथ पवार (४४ रा. साती आसरा कॉलनी जवळ,पाझर तलाव झोपडपट्टी मुळ रा.सुरगाणा) असे अटक केलेल्या संशयित पतीचे नाव आहे. मिरा पिनू पवार (४१) असे मृत्यू झालेल्या पत्नीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीनू सोमनाथ पवार याने पत्नी मिरा पिनू पवार हिला सोमवारी (दि.२०) रात्री संशयिताने जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता तिला वैद्यकीय सुत्रांनी मृत घोषित केले. घरात चक्कर येवून पडल्याचा बनाव संशयिताने केला होता. सकाळी शवविच्छेदनात तिला बेदम मारहाण करण्यात आल्याने मृत्यू झाल्याचे पुढे आले. याप्रकरणी पतीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोमवारी रात्री मद्याच्या नशेत पती पीनू याचा पत्नीसोबत वाद झाला. या वादानंतर त्याने पत्नीला मारहाण केली. फावड्याच्या लाकडी दांड्याने तिच्या छातीवर व पोटावर बेदम मारहाण केल्याने अंतर्गत रक्तस्त्राव होवून तिचा मृत्यू झाला. मंगळवारी (दि.२१) सकाळी शवविच्छेदन करण्यात आले. यावेळी तिचा मृत्यू अपघाती नसून खून असल्याचे उघड झाले. त्यानुसार पोलिसांनी पतीला अटक केली. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक रिजाय शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहे.