‘…गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा’, फडणवीसांवर सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

मागील अनेक दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

मागील अनेक दिवसांपासून राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हे माझे वैयक्तिक मत आहे’, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी टीकास्त्र सोडले. (due to law and order issue in the state ncp mp supriya sule slams dcm devendra fadnavis)

राज्यातील अनेक भागांत कोयता गँगने प्रचंड धुडगूस घातला आहे. या कोयता गँगमुळे नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी थेट गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. “दौंडमधली गुन्हेगारी, खून, पुण्यातील कोयता गँग, महिलांवर अत्याचार हे सातत्याने राज्यात होत आहे. राज्यात एवढे सगळे होतेय हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हे माझे वैयक्तिक मत आहे”, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी फडणवीसांवर हल्लाबोल केला.

त्याशिवाय “एकनाथजी आणि देवेंद्रजींना ईडी म्हणलेले आवडते. ईडी म्हणजे नक्की एकनाथ, देवेंद्र का आणखी काही माहिती नाही”, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

कसबा पोटनिवडणुकीवेळी आचारसंहितेचा भंग झाल्याचा दावा करण्यात आला. त्यावरून सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारला धारेवर धरले. “मला आश्चर्य वाटत नाही, कारण हे सरकार नियमाने चालत नाही. कायदे फक्त विरोधकांसाठी आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पक्ष करेलच”, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

“केंद्र सरकारच्या अनेक योजना या राज्यात राबवल्या जात नाहीत. माझ्या मतदारसंघात या योजना राबवत आहे. अजित पवार पालकमंत्री असताना दर शनिवारी लोकांना भेटत होते. आपल्या जिल्ह्यात एक लाखांवर लाभार्थी आहेत. साहित्य पाठवण्याची मागणी केंद्राकडे केली आहे. यात राजकारण नको. तुम्ही म्हणाल तो फोटो लावू. पण साहित्य द्या”, अशी खोचक टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली.

निधी राज्यासाठी आहे की पक्षासाठी आहे?

आपल्या सरकारने दिव्यांग बांधवांसाठी खूप केले. बाकीच्या राज्यांना निधी मिळतो तसाच, महाराष्ट्राला का मिळत नाही? निधी मिळतो तोही महाराष्ट्रातील काही मोजक्या जिल्ह्यांनाच मिळतो. त्यामुळे हा निधी राज्यासाठी आहे की पक्षासाठी आहे? आम्ही कधीच असल्या कामात राजकरण आणत नाही. या बांधवांना मदत नाही मिळाली तर हा गुन्हा आहे आणि केंद्र सरकार गुन्हेगार आहे, अशीही टीका सुप्रिया सुळे यांनी केली.

दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सातत्याने सत्ताधारी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले जात आहे. महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे राज्याच्या राजकारणात सक्रीय झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.


हेही वाचा – BBC Gujarat Riots Documentary : सर्वोच्‍च न्‍यायालयात 6 फेब्रुवारी रोजी होणार सुनावणी