घरCORONA UPDATELockdown : रेशनिंगच्या दुकानांमुळेच जास्त नागरिक रस्त्यांवर

Lockdown : रेशनिंगच्या दुकानांमुळेच जास्त नागरिक रस्त्यांवर

Subscribe

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घरीच बसावे, असे आवाहन महापालिका आणि सरकारच्यावतीने केले जात असले तरी मुंबईत स्वस्तात धान्य मिळवण्यासाठी शिधावाटप दुकानांसमोर लोकांची गर्दी होवू लागली.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लोकांनी घरीच बसावे, असे आवाहन महापालिका आणि सरकारच्यावतीने केले जात असले तरी मुंबईत स्वस्तात धान्य मिळवण्यासाठी शिधावाटप दुकानांसमोर लोकांची गर्दी होवू लागली. मात्र, शिधावाटप दुकानांमध्ये धान्यच उपलब्ध नसल्यामुळे तसेच एका वेळी एकाच धान्याचे वाटप केल्यामुळे गरीबांना या रेशनसाठी आपल्या इच्छेविरोधात केवळ पोटाची खळगी भरण्यासाठी दिवसांतून दोनदा या दुकानांसमोर रांगा लावण्याची वेळ आली आहे. त्यामुळे रस्त्यांवरील गर्दी कमी करण्यात केवळ शिधावाटपांच्या दुकानांमुळे शक्य होत नसल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र दुकाने, हॉटेल, कंपन्या, उद्योगधंदे बंद करण्यात आल्यामुळे हातावर पोट असलेल्या गरीब कुटुंबाचे मोठे हाल होत आहे. त्यामुळे या गरीब कुटुंबांना रेशनवर मिळणाऱ्या स्वस्त धान्याचाच आधार आहे. करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांची रस्त्यांवरील गर्दी करून त्यांना सोशल डिस्टंसिंग राखण्याचे आवाहन केले जात आहे. एका बाजुला लोकांना भाजीपाला व किरणा दुकानांवरील सामान खरेदीसाठी ठराविक वेळ राखीव ठेवून त्याच दरम्यान खरेदीची संधी दिली जाते. परंतु या भाजीपाला व किराणा माल खरेदीच्या तुलनेत अनेक गरीब व गरजु कुटुंबांची शिधावाटपाच्या दुकानांवर गर्दी होत आहे. परंतु अनेक शिधावाटप दुकानांवर धान्यच उपलब्ध नसल्यामुळे दुकाने खुली असूनही धान्य खरेदीअभावी निराश होवून परतावे लागते. तर अनेक शिधावाटप दुकानांमध्ये एकावेळी एकच धान्य पुरवले जाते. त्यामुळे बऱ्याचदा प्रत्येक धान्यासाठी लोकांना पुन्हा पुन्हा दुकानांसमोर रांगा लावाव्यात लागतात. त्यामुळे गरीबांना केवळ मोफत धान्यासाठी वारंवार रस्त्यांवर उतरावे लागत आहे.

- Advertisement -

विशेष म्हणजे बहुतांशी विभागांमध्ये काही शिधावाटप दुकाने बंदच असून लोकांना या बंद दुकानांचे दर्शन घेवूनच माघारी फिरावे लागते. विलेपार्ले येथील भाजपचे आमदार पराग अळवणी यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना पत्र लिहून या मतदार संघातील शिधावाटप दुकानांमध्ये  मोफत धान्य योजना अद्याप योग्यपद्धतीने राबवली जात नसल्याचे म्हटले आहे. सहार गावातील एकाच शिधावाटप केंद्रात मोफत धान्य आलेले आहे. पण तिथे पूर्ण कोटा नाही. मरोळ मध्ये सुद्धा ७ पैकी एकाच दुकानात धान्य आले आहे. बामणवडा येथे सुद्धा अशीच परिस्थिती आहे. तर पार्ले पश्चिम व पूर्व तसेच सांताक्रूझ पूर्व मध्ये सुद्धा परिस्थिती चांगली नसल्याचे या पत्रात म्हटले आहे. त्यामुळेच लोकांना वारंवार रेशनदुकानांसमोर रांगा लावूनही धान्य मिळत नाही.

गुरुवारी महापौरांनी एम-पूर्व व एम-पश्चिम विभागातील नगरसेवकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळीही बहुतांशी सर्वच नगरसेवकांनी शिधावाटप दुकानांवरील धान्य उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय याबाबत समस्या मांडली. संपूर्ण मुंबईत शिधावाटप दुकानांवर लोक सकाळी लवकर येत रांगा लावूनही त्यांना कोणत्याही वस्तू मिळतील याची शाश्वती नसते. त्यामुळे अनेकदा निराश होवून परतावे लागत असल्यामुळे लोकांना पुन्हा पुन्हा रस्त्यावर यावे लागत असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींकडून मांडली जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -