Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शरद पवारांच्या निर्णयामुळे मविआची 'वज्रमूठ' सुटली, पुढील सभा होण्याची शक्यता कमी

शरद पवारांच्या निर्णयामुळे मविआची ‘वज्रमूठ’ सुटली, पुढील सभा होण्याची शक्यता कमी

Subscribe

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरून बाजूला होण्याचा निर्णय शरद पवार (Sharad Pawar) यांनी घेतला. पण त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या (MVA) उर्वरित चार सभा होण्याची शक्यता कमीच आहे. पवारांच्या एका निर्णयामुळे महाविकास आघाडीची ही ‘वज्रमूठ’ (Vajramuth) सुटल्यातच जमा आहे. कारण ठाकरे गटाकडून सभा होणारच, असे सांगितले जात असले तरी, काँग्रेसने (Congress) अवकाळी पावसाचे कारण पुढे केले आहे तर, राष्ट्रवादी काँग्रेसने उन्हाच्या वाढलेल्या तीव्रतेचे कारण पुढे केले आहे. विशेष म्हणजे, वादळ, वारा, पाऊस जरी असला तरी, या सभा होणारच असा निर्धार महाविकास आघाडीने केला होता.

राज्यात होऊ घातलेल्या विविध महानगरपालिकेच्या निवडणुकांबरोबरच, पुढील वर्षी 2024मध्ये होणाऱ्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुका लक्षात घेता, महाविकास आघाडीने एप्रिल ते जून या कालावधीत राज्यभरात संयुक्तपणे सात ‘वज्रमूठ’ सभा घेण्याचे नियोजन केले होते. त्यानुसार 2 एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर येथे पहिली ‘वज्रमूठ’ सभा झाली. त्यापाठोपाठ दुसरी सभा 16एप्रिल रोजी नागपूर येथे तर, 1 मे रोजी मुंबईत तिसरी सभा झाली. या तिन्ही ‘वज्रमूठ’ सभांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने शिंदे गटासोबतच भाजपाला लक्ष्य करण्यात आले होते.

- Advertisement -

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना या सभांचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला होता. नियोजनानुसार चौथी सभा 14मे रोजी पुण्यात होणार असून त्याचे प्रतिनिधित्व अजित पवारांकडे आहे. कोल्हापूरला 28मे रोजी सभा होणार असून त्यासाठी सतेज पाटील पुढाकार घेणार आहेत. 3 जून रोजी नाशिकमध्ये आणि यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्त्वाखाली 11जून रोजी अमरावतीला सभा होणार आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घडलेल्या नाट्यमय घडामोडींनंतर या ‘वज्रमूठ’ सभांचे भवितव्य अधांतरी झाले आहे.

मुंबईतील यशवंतराव सभागृहात महाविकास आघाडीच्या नेत्यांची त्यावेळी बैठक झाली होती. त्यात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, ऊन, पाऊस, वादळ, अवकाळी पाऊस काहीही असो या सभा होणारच, असा निर्धार त्यावेळी व्यक्त केला होता. परंतु आता शरद पवार बाजूला झाल्यानंतर राष्ट्रवादीचे सुकाणू कोणाच्या हाती राहणार, यावर बाबत तर्कवितर्क मांडण्यात येत आहेत. वज्रमूठ सभांबद्दलही तसेच मत व्यक्त होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ऊन्हाचेच कारण दिले आहे. सध्या उन्हाची वाढती तीव्रता पाहता वज्रमूठ सभेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. बीकेसीतील सभेनंतर उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, नाना पटोले आणि जयंत पाटील याची बैठक झाली, त्यात हा निर्णय घेण्यात आल्याचे जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

तर, काँग्रेसचे अध्यक्ष नाना पाटोले यांनी पावसाचे कारण दिले आहे. राज्यात सध्या विविध ठिकाणी अवकाळी पाऊस हजेरी लावत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीची याबाबत लवकरच बैठक होईल आणि त्यात निर्णय घेण्यात येईल. पुण्यातील वज्रमूठ सभा होईल की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही, असे नाना पटोले म्हणाले.

दुसरीकडे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र 28 मेची सभा होणारच, असे ठामपणे सांगितले. मात्र त्याआधी पुण्याला 14 मे रोजी वज्रमूठ सभा होणार का, याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही.

- Advertisment -