धक्कादायक : सुस्साट डंपर थेट घुसला शाळेत

 

सिंधुदुर्गः जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कणकवली- आचरा मार्गावर दिवसरात्र सुस्साट फिरणार्‍या डंपरमुळे नागरिकांचा जीव टांगणीला लागला आहे. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास याच मार्गावर पळसंब गावच्या हद्दीत एक डंपर थेट शाळेतच घुसला. या डंपरच्या भीषण धडकेमुळे शाळेच्या भिंतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर डंपर मालकाने मोठ्या घाईने आपले वाहन अपघात स्थळावरून हलवून पळ काढला.

त्यानंतर चर्चा करून ग्राम शिक्षण समिती आणि प्रशासनाने नुकसान भरपाई घेऊन हे प्रकरण मिटवले आहे. परंतु,जर शाळा सुरू असती आणि अशा प्रकारचा अनर्थ घडला असता तर झालेले नुकसान यापेक्षाही भयंकर असले असते,अशी भावना ग्रामस्थ व्यक्त करत आहेत. अशा अपघातांवर तात्पुरता तोडगा न काढता मुलांच्या सुरक्षिततेबाबत कायमस्वरूपी उपाय काढण्याची गरज असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

या घटनेचे प्रत्यक्षदर्शी आणि ग्रामपंचायत सदस्य अक्षय परब यांनी सांगितले की,अशा घटना याआधी देखील या रस्त्यावर झाल्या आहेत.याबाबत कायम स्वरूपी उपाय करण्याची गरज असून भिंत किंवा लोखंडी संरक्षण उभारण्याची गरज आहे.तरच मुले सुरक्षित राहतील.

तसेच , परिस्थितीनुसार या अपघातानंतर तोडगा काढण्यात आला.परंतु,मुलांच्या सुरक्षिततेसाठी कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज आहे,असे माजी सरपंच आणि नागरिक चंद्रकांत गोलतकर यांनी सांगितले.

गेली अनेक वर्षे पाठपुरावा केल्यानंतरही गावातील नागरिकांच्या आणि मुलांच्या सुरक्षिततेबाबत तसेच प्रशासन गंभीर असल्याचे दिसत नाही.या मार्गावर शाळेचा परिसर हा अपघात प्रवण आहे.परंतु,याकडे दुर्लक्ष केले जात असून अशा अपघातांना आळा घालण्यासाठी प्रशासन गंभीर असल्याचे दिसत नाही.या ठिकाणच्या रस्ता सुरक्षेबाबत दोनदा माहिती अधिकारात माहिती मागवल्यानंतर एक छोटासा फलक लावण्यात आला.परंतु या सुस्साट डंपरसाठी हा फलक काहीच नसून असे अपघात पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेण्याची गरज असल्याचे या विषयाचा पाठपुरावा करणार्‍या रोशन चिंचवलकर यांनी सांगितले.

या घटनेनंतर तरी प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी पूर्ण करण्यासाठी कार्यवाही करावी, अशी मागणी होत आहे.