घरठाणे'एसटी'ला बाप्पा पावला; गणेशोत्सवात ठाणे विभागाचे उत्पन्न 3 कोटींवर

‘एसटी’ला बाप्पा पावला; गणेशोत्सवात ठाणे विभागाचे उत्पन्न 3 कोटींवर

Subscribe

कोरोनाचे सर्वच निर्बंध यंदा शिथिल केल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गणेशोत्सवात चाकरमान्यांना गावी सोडण्यासाठी टॉप गिअर टाकला होता. त्यामुळे यंदा ठाणे विभागाने गणेशोत्सवासाठी कोकणात १ हजार ००१ गाड्यांचे नियोजन केले होते.

ठाणे: कोरोनाचे सर्वच निर्बंध यंदा शिथिल केल्याने महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने गणेशोत्सवात चाकरमान्यांना गावी सोडण्यासाठी टॉप गिअर टाकला होता. त्यामुळे यंदा ठाणे विभागाने गणेशोत्सवासाठी कोकणात १ हजार ००१ गाड्यांचे नियोजन केले होते. त्याला चाकरमान्यांकडून उदंड प्रतिसाद लाभल्याने ती संख्या १ हजार ३०५ वर झाली. त्यामुळे अवघ्या पाच दिवसांचे ठाणे विभागाचे उत्पन्न हे २ कोटी ९१ लाख ६४ हजार ७६८ रुपयांच्या घरात पोहोचल्याने एसटीच्या लालपरीला यंदा बाप्पा पावला असेच म्हणावे लागले. तर गणेशोत्सवात एसटीचे भारमान हे ९६ टक्क्यांवर गेले असून प्रति किलोमीटर उत्पन्न ५९.८१ टक्के इतके झाल्याची माहिती ठाणे विभागाने दिली. (during Ganeshotsav msrtc 3 crores of income of Thane division )

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे एसटी प्रवास मागील दोन वर्षात चांगलाच ब्रेक लागला होता. मात्र गतवर्षी कोरोना निर्बंध शिथिल झाले होते. तेव्हा ९०० गाड्या ठाणे विभागामार्फत कोकणात सोडण्यात आल्या होत्या. त्यातच यंदा मात्र सर्वच निर्बंध शिथिल झाल्याने ठाणे विभागाने जोरदार तयारी करत चक्क १ हजार ००१ गाड्या सोडण्याचे नियोजन केले होते. त्यालाही कोकणच्या चाकरमान्यांनी भरभरून प्रतिसाद दिल्याने नियोजनापेक्षा यंदा ३०४ गाड्या म्हणजे १ हजार ३०५ गाड्या सोडण्यात यश आले. त्यामुळे ठाणे एसटी विभागाचे २६ ते ३० ऑगस्ट दरम्यानचे उत्पन्न थेट २ कोटी ९१ लाख ६४ हजार ७६८ इतक्यावर पोहोचले. हे उत्पन्न जवळजवळ गतवर्षापेक्षा यंदा सव्वा कोटींनी वाढले आहे. तर या कालावधीत ४ लाख ८७ हजार ६५०.२ किलो मीटर लालपरी धावल्याने भारमान ही याच दिवसात ९६ टक्के इतके झाले आहे.तर प्रति किलो मीटर उत्पन्न हे ५९.८१ इतके झाले असून पाच दिवसात ५५ हजार ८०८ चाकरमान्यांनी लालपरीतून सुरक्षित आणि आरामदायी प्रवास केल्याची माहिती ठाणे विभागाने दिली.

- Advertisement -

चाकरमान्यांसाठी शिवशाहीही धावली

गणेशोत्सव चाकरमान्यांनी सुरक्षित आणि आरामदायी सेवेची मागणी केली. त्यासाठी असेल ते भाडेही देण्याची तयारी दर्शविली. त्यातूनच पुढे कोकणात जाण्यासाठी मागणी वाढल्याने अखेर शिवशाही बसेसही सोडण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आले.

- Advertisement -

ठाण्यासह बारा विभागांची लाभली साथ

गणेशोत्सवात वाढता प्रतिसादात लक्षात घेत, ठाण्यासह रायगड,कोल्हापूर, सांगली, सोलापूर, पुणे, नाशिक, धुळे, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा,रत्नागिरी या विभागांची साथ लागल्याने ही मोहीम फत्ते झाली.

गतवर्षीपेक्षा यंदा ही कोकणात जाणाऱ्या ठाण्यातील चाकरमान्यांनी एसटी वर विश्वास दाखवत उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे गणेशोत्सव काळात ठाणे विभागाचे उत्पन्न २ कोटी ९१ लाख ६५ हजारांच्या जवळपास घरात गेले आहे. नागरिकांच्या मागणीप्रमाणे सेवा देण्याचे काम चोखपणे बजाविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
– विनोदकुमार भालेराव, विभागीय नियंत्रक अधिकारी, ठाणे.


हेही वाचा – ‘सैराट’मधील सूरज पवार ऊर्फ ‘प्रिन्स दादा’ला अटक होण्याची शक्यता, नेमके प्रकरण काय?

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -