CoronaVirus: लॉकडाऊन दरम्यान ब्युटी पार्लरमध्ये केस कापणे पडले महागात!

कोल्हापूरमधील इचलकरंजीमध्ये लॉकडाऊनमध्ये ब्युटी पार्लर सुरू असल्याचे समोर आले. त्यामुळे मालकिणीसह दोन महिला ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

parlour
पार्लर

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. या लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक वस्तूंची दुकाने उघडकास परवानगी आहे. तरी देखील अनेक ठिकाणी या लॉकडाऊनचे पालन केले जात नसल्याचे दिसत आहे. दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढू नये याकरिता सलून आणि ब्युटी पार्लर देखील उघडण्यास बंदी आहे. मात्र कोल्हापूर मधील इचलकरंजीत ब्युटी पार्लर सुरू केल्याचे समोर आले आहे. यामुळे या ब्युटी पार्लरच्या मालकिणीसह दोन महिला ग्राहकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी इचलकरंचीमधील गांधी पुतळा परिसरातील सवेरा ब्युटी क्लिनिक या पार्लरवर गावभाग पोलिसांनी कारवाई केली आहे.

महात्मा गांधी पुतळा परिसरातील हे ब्युटी पार्लर सुरू करण्यात आले होते. यावेळेस या पार्लरमध्ये सोशल डिस्टन्सिंग न ठेवता केस कटींग केले जात असल्याचे आढळून आले. तसेच कोणीही मास्क देखील लावला नव्हता. सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी पोलीस नाईक उज्जवला यादव यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे ४२ वर्षीय मालकिणीसह ३३ आणि २७ वर्षांच्या दोन महिला ग्राहकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देशातील कोरोनाबाधितांचा आकडा ८२ हजारपार झाला आहे. त्यापैकी २ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे. राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारपार झाला आहे.


हेही वाचा – LockDown: बायकोने ओतले नवऱ्याच्या अंगावर उकळलेले पाणी; कारण ऐकून व्हाल अचंबित