घर उत्तर महाराष्ट्र ऐन पावसाळ्यात वागदर्डी धरणाने गाठला तळ; मनमाड शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई

ऐन पावसाळ्यात वागदर्डी धरणाने गाठला तळ; मनमाड शहरात अभूतपूर्व पाणीटंचाई

Subscribe

नाशिक : मनमाड शहराला पाणीपुरवठा करणार्‍या वागदर्डी धरणाने तळ गाठला असून, सध्या धरणात केवळ मृत साठा उरला आहे. त्यामुळे शहरात भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून, हंडाभर पाण्यासाठी भटकंतीची वेळ नागरिकांवर आली आहे. या पार्श्वभूमीवर पालखेड धरणातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार सुहास कांदे यांनी पाटबंधारे विभागाकडे केली आहे.

मनमाड शहराचा पाणीपुरवठा हा पावसाळ्याच्या पाण्यावर कमी आणि पालखेड धरणातून मिळणार्‍या आवर्तनावर अधिक अवलंबून असतो. पालखेड धरणातून पाण्याचे आवर्तन सोडण्यात आल्यानंतर ते पाणी पाटोदात साठवले जाते. त्यानंतर पंपिंग करून वागदर्डी धरणातून शहरात पाणीपुरवठा केला जातो. मात्र, यंदा पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांचा कालावधी लोटूनही शहर परिसरात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. विशेषतः वागदर्डी धरणाचे पाणलोटक्षेत्र कोरडेच आहे. एकीकडे पावसाने पाठ फिरवली तर दुसरीकडे धरणात जेमतेम पाणी उरले आहे. सध्या धरणात केवळ 25 दशलक्ष घनफूट एवढाच पाणीसाठा शिल्लक असून, त्यात सुमारे 3 ते 4 दशलक्ष घनफूट पाण्याचा मृतसाठा आहे. त्यामुळे पालिका प्रशासनातर्फे शहरात महिन्यातून एकदाच पाणीपुरवठा केला जात असल्याने सव्वा लाख नागरिकांना भीषण पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

- Advertisement -

शहरावरील पाणीसंकट दूर करण्यासाठी पालखेड धरणातून तातडीने पाण्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी आमदार कांदे यांनी पाटबंधारे विभागाकडे पत्राद्वारे केली आहे. पत्रात म्हटले आहे की, पावसाअभावी धरणातील पाणीसाठा संपत आलेला आहे. शिवाय भूमिगत पाण्याची पातळीदेखील झपाट्याने कमी होत असल्याने बोअरवेल बंद पडू लागले आहेत. त्यामुळे शहरावर पाणीटंचाईचे दुहेरी संकट असून. पालखेडमधून आवर्तनाची नितांत गरज आहे.

दरम्यान, शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली लागावा यासाठी आमदार सुहास कांदे यांनी शासनाकडून तब्बल 350 कोटींची करंजवन पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणल्यानंतर योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू असून, सुमारे 50 किमीपर्यंत पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामदेखील जोरात सुरू आहे. जोपर्यंत ही योजना पूर्ण होत नाही तोपर्यंत नागरिकांना या ना त्या कारणाने पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे. योजना पूर्ण होताच शहरातील सव्वालाख नागरिकांना रोज पाणी मिळणार आहे.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -