घरताज्या घडामोडीनवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि संघावर हल्ला

नवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजप आणि संघावर हल्ला

Subscribe

देशात हिंदुत्वाला धोका नसल्याचे केंद्रीय गृह मंत्रालय सांगत असले तरीही हिंदुत्वाला उपटसुंभ नवहिंदुत्वापासून धोका आहे, अशा शब्दात मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर जोरदार हल्ला चढवला. हिंदुत्वाची शिडी वापरून सत्तेची गाजरे खाणारे आता इंग्रजांप्रमाणे तोडा आणि फोडा नीती वापरतील. मराठी, अमराठी अशा भिंती उभ्या करतील. त्यामुळे मुंबई, महाराष्‍ट्रातील जनतेने आता तमाम वाद बाजूला ठेवून मराठी-अमराठी, जाती-धर्म, प्रांतवाद हे दूर सारून हिंदुत्वाची भकम एकजूट करावी, असे आवाहनही ठाकरे यांनी केले.

शिवसेनेचा पारंपरिक दसरा मेळावा आज माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात पार पडला. या मेळाव्यात शिवसेनेच्या अन्य नेत्यांच्या भाषणाला फाटा देत फक्त उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. विशेष म्हणजे व्यासपीठावर कोणतीही खुर्ची नव्हती. शिवसेनेचे सर्व नेते सभागृहातील खुर्चीवर आसनस्थ होते. उद्धव ठाकरे यांनी व्यासपीठावर उभे राहूनच शिवसैनिकांना मार्गदर्शन केले. उद्धव ठाकरे यांनी आजच्या भाषणात अपेक्षेप्रमाणे भाजप, मोदी, फडणवीस यांच्यावर टीका करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनाही टोले लागवले.

- Advertisement -

मी मुख्यमंत्री असलो तरी मी हिंदुत्‍ववादीच आहे. पण मुख्यमंत्री म्‍हणून मी सगळयांना समानतेनेच वागविणार. आमचे हिंदुत्‍व हे राष्‍ट्रीयत्‍व आहे. घरात आम्‍ही हिंदू असतो पण बाहेर पडतो तेव्हा देश हाच आमचा धर्म असतो. १९९२-९३ साली शिवसैनिक होता म्‍हणूनच सगळे वाचले. आता हिंदुत्‍वाच्या बाता मारणारे तेव्हा शेपूट घालून बसले होते, अशी टीका ठाकरे यांनी भाजपचे नाव न घेता केली. ठाकरे यांनी आपल्या भाषणात मोहन भागवत यांनी संघाच्या दसरा मेळाव्यात केलेल्या विधानावरून सवाल उपस्थित केले. सर्वांचे पूर्वज एक होते, असे भागवत म्हणाले होते. मग विरोधी पक्षाचे, आंदोलकर्त्या शेतकऱ्यांचे पूर्वज काय परग्रहावरून आले होते काय? असा सवाल करत तुमच्या वर्गातून बाहेर पडलेल्याना हिंदुत्व शिकविण्याचा सल्ला त्यांनी दिला.

संघाचे आणि आपले हिंदुत्वाचे विचार एक आहेत. केवळ हिंदुत्वामुळे युती झाली. भाजपने शिवसेनेला दिलेले वचन मोडले नसते तर आज ज्यांना मुख्यमंत्री असल्यासारखे वाटते ते मुख्यमंत्री झाले असते. पण वचन मोडले म्हणून हे पद त्यांच्या नशिबी नाही. मी शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदावर बसवेन.केवळ पुत्रकर्तव्य म्‍हणून ही जबाबदारी मी स्‍वीकारली. अजून हे वचन सर्वार्थाने पूर्ण झालेले नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले असते तर कदाचित मी राजकीय जीवनातूनही बाजूला झालो असतो. कारण हे क्षेत्र माझे नाही. पण मी मोठ्या विचारपूर्वक ही जबाबदारी स्‍वीकारली आणि आता पाय रोवून उभा राहिलो आहे. पण हे काही थोतांड नाही.’मै फकीर हू,झोली लेके जाउंग’ हे झोळी बिळी  असले कर्मदरिद्री विचार आमचे नाहीत..मला तर मी मुख्यमंत्री आहे असे कधीच वाटू नये.तुमच्या घरातलाच एक  भाऊ असल्‍यासारखेच मला  वाटते, असा टोला ठाकरे यांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता लागवला.

- Advertisement -

ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचाही समाचार घेतला. गांधी – सावरकर वाद घालणाऱ्यानी देशासाठी काय केले? यांना गांधी आणि सावरकर समजले आहेत काय? असे सवाल करत भारतमाता की हे बोलून आपण देशाच्या जवानांपेक्षाही देशभक्त आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न होत आहे हे माझ्या देशाचे दुर्दैव आहे, असे ठाकरे म्हणाले.

ठाकरे यांनी आपल्या भाषणात शिवसेनेवर आरोप करणाऱ्यांनाही खास आपल्या शैलीत प्रत्युत्तर दिले. शिवसेनेवर हल्‍ला करणारा कधी जन्मला नाही आणि कधी जन्माला देखील येणार नाही. कितीही टकरा,धडका मारल्‍या तरी तुमचीच डोकी फुटतील पण आमच्या वाडयाला चिरा जाणार नाहीत. ईडी,सीबीआयच्या माध्यमातून धमक्‍या देणे हा केवळ नामर्दपणा नाही तर याला अक्‍करमाशीपणा म्‍हणतात, अशा शब्‍दांत ठाकरे यांनी भाजप नेत्यांना सुनावले.

ईडी, सीबीआयचा वापर करू नका

सध्या महाविकास आघाडी सरकारमधील नेते आणि त्यांच्या कुटुंबियांमागे केंद्रीय चौकशी यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे.  त्यावरूनही ठाकरे यांनी तोफ डागली. ईडी,सीबीआयच्या माध्यमातून धमक्‍या  देऊ नका. हिंमत असेल तर स्‍वतःच्या ताकदीने सामोरे या. मला पण जर कोणाला सामोरे जायचे असेल तर मुख्यमंत्रिपदाची ताकद वापरून मी सामोरा जाणार नाही. माझ्या शिवसैनिकांच्या ताकदीवरच मी सामोरा जाईन. सध्या अनेक जण चिरकत आहेत.पण माझा वाडा चिरेबंदी आहे. कितीही धडका मारा अजिबात तडा जाणार नाही. माझा आवाज दाबणारा कधी जन्माला आला नाही आणि येणारही नाही. ठाकरे कुटुंबियांवर हल्‍ले सुरू आहेत.पण असा कोणी मायेचा पूत जन्माला आलेला नाही. तिथल्‍या तिथे त्याला ठेचून टाकू, असा इशाराही त्‍यांनी दिला.

सर्वात मोठ्या पक्षाला उमेदवारही मिळत नाही

हर्षवर्धन पाटील अनाहूतपणे बोलून गेले की भाजपात गेल्‍यानंतर आता त्‍यांना सुखाची झोप लागते. त्‍यांच्यासारखी जी लोक भाजपमध्ये गेली आहेत त्‍यांना खरे तर भाजपने ब्रँड ॲम्‍बेसेडर म्‍हणून नेमले पाहिजे. भाजपत गेल्‍यानंतर गंगा नाही तर गटारगंगा असा यांचा प्रकार सुरू असल्‍याची टीकाही त्‍यांनी केली. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष असल्‍याच्या बाता मारतो.पण पंढरपूर आणि आता देगलूरच्या पोटनिवडणुकीत त्यांना स्वतःचा उमेदवार मिळाला नाही, असा टोलाही त्‍यांनी भाजपला लगावला.

केंद्राच्या इतकीच राज्‍येही सार्वभौम

भारतीय संघराज्‍य व्यवस्‍थेवरही आता देशाच्या अमृतमहोत्‍सवी वर्षात एकदा वैचारिक मंथन झाले पाहिजे असे सांगून उद्धव ठाकरे म्‍हणाले,देशाची घटना ठरत होती तेव्हा डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनाही केंद्राच्या दडपणाखाली राज्‍ये टिकतील का असे प्रश्न विचारण्यात आले होते.तेव्हा त्‍यांनीही ठामपणे सांगितले होते की केंद्राप्रमाणेच राज्‍येही सार्वभौम आहेत.केवळ आणिबाणीसदृश स्‍थिती,परकीय आक्रमण आणि परराष्‍ट्र संबंध हेच केंद्राचे अधिकार आहेत.त्‍यामुळे आता राज्‍य आणि केंद्राच्या अधिकारांवर देशातील विचारवंत,कायदेतज्ञ यांनी आपली मते मांडली पाहिजेत.त्‍यानंतरही जर केंद्राने राज्‍याच्या कारभारात ढवळाढवळ केली तर ते घटनाबाहय ठरेल.लाल,बाल,पाल हे आपण देशाच्या  स्वातंत्र्य लढयात पाहिले.आताही महाराष्‍ट्र,पंजाब आणि बंगाल ठामपणे उभा राहिला आहे.ममतादिदींनी तर बंगालचे पाणी केंद्राला दाखवून दिल्‍याचेही ठाकरे म्‍हणाले.

सत्तापिपासूपणाचे व्यसन यांना लागलेय

भाजपला सत्तापिपासूपणाचे व्यसन लागल्‍याची टीका करताना  ठाकरे म्‍हणाले,अंमलीपदार्थांचे व्यसन लागते तसेच यांना सत्तापिपासूपणाचे व्यसन लागले आहे. सत्तेची चटक यांना लागली असल्‍याने ते आता इतरांची कुटुंबेही उदध्वस्‍त करायला लागले आहेत.हे व्यसन आता देशातून उपटून काढायला हवे.

गुजरातला सर्वाधिक निधी

देशातील बंदरांचा ७५ टक्‍के सीएसआर फंड आता गुजरातकडे वळविण्यात आला आहे.मोदी सरकार आल्‍यानंतर गुजरातला मिळणा-या निधीत साडेतीनशे टक्‍क्‍यांनी वाढ झाल्‍याचे ताशेरे कॅगनेच ओढले आहेत,असेही  उद्धव ठाकरे म्‍हणाले.

धारावीत जागतिक आर्थिक केंद्र

धारावीचा विकास करून धारावीकरांचे घराचे स्‍वप्न तर पूर्ण करण्यात येणारच आहे.पण त्‍याचसोबत धारावीत जागतिक आर्थिक केंद्रही उभारण्यात येणार आहे.चीनमधून आता मोठ्या  प्रमाणात उदयोगधंदे बाहेर पडत आहेत.महाराष्‍ट्रात मोठया प्रमाणात  उद्योग कसे येतील यासाठीही आमचा प्रयत्‍न सुरू असल्‍याचे ते म्‍हणाले.मुंबईत लष्‍कराचे एक मोठे संग्रहालय उभारण्यात येणार आहे.त्‍यात सीमेवर आपला जवान कशा प्रकारे  ऊन,थंडी,वारा आणि शत्रू यांना तोंड देत उभा असतो याची प्रत्‍यक्ष अनुभूती जनतेला मिळवून देण्यात येणार असल्‍याचेही ठाकरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -