षण्मुखानंदमधील दसरा मेळावा पक्षप्रमुखांना अडचणीचा?

shiv sena dussehra rally

राज्यातील सर्वसामान्य चित्रपट-नाट्य रसिकांना मनोरंजनासाठी २२ ऑक्टोबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण कोविडच्या तिसर्‍या लाटेची भीती बाळगणारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महाविकास आघाडीने जे आस्ते कदम धोरण स्वीकारलेले आहे, त्यामुळे संपूर्ण मनोरंजनसृष्टी दीड वर्ष प्रतीक्षेत आहे.

त्याच वेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतःच्या पक्षाचा दसरा मेळावा मात्र येत्या १५ तारखेला माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये घेण्याचा घाट घातला आहे. दसरा मेळावा जोरदार करून अडगळीत पडलेल्या शिवसेनेतील काही नेत्यांना तर दरबारी वक्ता म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नजरेत भरण्याचे वेध लागलेल्या सेना नेत्यांनीही मुख्यमंत्र्यांना जणू काही अडचणीत आणण्याचे चक्रव्यूह रचले असल्याचे मंगळवारच्या घटनांवरून स्पष्ट झाले आहे.

शिवसेनेतील विश्वसनीय सूत्रांनुसार, उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि राज्यसभेचे खासदार अनिल देसाई यांनी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहामध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा व्हावा अशी आग्रही भूमिका घेतलेली आहे. या दोन्ही नेत्यांबरोबर शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देखील मेळावा व्हावा याबाबत आग्रही भूमिका कायम ठेवली आहे. दसरा मेळाव्याला उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून संबोधित करावे आणि मुख्यमंत्री म्हणून होणारी टीका टाळावी अशी भूमिका मांडणारा पक्षप्रमुखांच्या सहकार्‍यांचा एक गट आहे.

राज्यातील जनतेला संयमाची भूमिका घेण्यासाठी स्वत: मुख्यमंत्रीच भाग पडत असताना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर मेळाव्याला संबोधित केल्यास त्याची मोठी किंमत शिवसेनेला चुकवावी लागेल, असा एक मतप्रवाह शिवसेनेत आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांनी मेळाव्याला वर्षावरून संबोधित करावे,अशी पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची भूमिका आहे. मात्र, मुख्यमंत्री यांचे शासकीय निवासस्थान असल्यामुळे इथून पक्षाला संबोधित करण्याची तांत्रिक चूक, सावध पावले टाकणार्‍या पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी करू नये, असे मातोश्रीच्या काही निकटवर्तीयांना वाटत आहे.

कोविडची तिसरी लाट उसळी घेऊ नये म्हणून गेले अठरा महिने नाट्य आणि चित्रपटगृहे बंद ठेवण्यात आलेली आहेत. मध्यंतरी ती अर्ध क्षमतेने सुरू करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, मुख्यमंत्री ठाकरे यांनी नाट्य, चित्रपट निर्माते आणि थिएटर मालक यांच्या आग्रही मागणीनंतरही मनोरंजन सृष्टीतील मंडळींना संयमाची भूमिका घ्यायला भाग पाडले. चित्रपट क्षेत्रातील संबंधित अनेक नेत्यांनी याबाबतीत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. त्या सगळ्यांना उद्धव ठाकरे यांनी थोपवून धरण्यात बाजी मारली. राज्यभरात कोविडची परिस्थिती नियंत्रणात येण्यामध्ये मुख्यमंत्री ठाकरे यांची संयमाची भूमिका खूपच महत्त्वाची ठरलेली आहे. आता मात्र शिवसेनेने दसरा मेळाव्याचे आयोजन येत्या शुक्रवारी माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात १५ तारखेला करून स्वतःचीच प्रशासकीय आणि राजकीय कोंडी करून घेण्याचे ठरवले आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा हा पक्षाच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वपूर्ण कार्यक्रम समजला जातो. पुढील वर्षासाठी शिवसेनेची धोरणे आणि दिशा याच मेळाव्यात गेली अनेक वर्षे निश्चित होत असतात. त्यामुळे या मेळाव्याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागलेले असते. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून शिवसेनेतील काही नेते मंडळी अडगळीत गेल्याचे दिसून येत आहे. यातील काही नेत्यांनी हा मेळावा होण्याबाबत अत्यंत आग्रही भूमिका घेतलेली आहे, तर काही वरिष्ठ नेत्यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी या मेळाव्याला मातोश्रीतूनच संबोधित करावे, असे सुचवले आहे.

सर्वसामान्य जनतेला एक न्याय आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्या शिवसेनेला वेगळा न्याय असा विरोधी संदेश या दसरा मेळाव्याच्या आयोजनाने जाणार आहे. नाट्यगृह आणि चित्रपटगृहे बंद असल्यामुळे अनेक चित्रपट प्रदर्शनाविना प्रतिक्षेत आहेत. त्यामुळे हजारो कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. असे असताना आपल्या राजकीय फायद्यापोटी काही नेते मंडळी उद्धव ठाकरे यांना जनक्षोभाचा चक्रव्यूहात लोटत आहेत.

षण्मुखानंद या माटुंग्यातील सभागृहाची अधिकृत क्षमता साडेतीन हजार आसन क्षमतेची आहे. यातील निम्म्या आसन क्षमतेसहित दसरा मेळावा करण्याचे शिवसेनेने ठरवले आहे. सुमारे साडेसतराशे ते अठराशे उपस्थितांपैकी राज्यभरातील नगरसेवक,आमदार, खासदार, राज्यमंत्री कॅबिनेट मंत्री आणि पदाधिकारी यांचा समावेश असणार आहे. या सभागृहात प्रवेश मिळवण्यासाठी आयोजन समितीत असलेल्या काही नेत्यांना पुन्हा एकदा मुख्य प्रवाहात येण्यासाठी संधी मिळू शकणार आहे. आपल्या राजकीय भवितव्यासाठी ही मंडळी गेली दोन वर्षे व्यक्तिगत कोणतीही चूक न करणार्‍या उद्धव ठाकरे यांना थेट अडचणींचा सामना करायला लावण्याच्या विचारात आहेत, याबाबत प्रतिक्रिया मिळवण्यासाठी शिवसेनेच्या अनेक नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता या विषयावर प्रतिक्रिया देण्यास सर्वांनीच नकार दिला. त्यामुळे हा मेळावा आता पक्षप्रमुखांच्या कोअर टीममध्येच कोंडीत सापडल्याने नेमका कुठे होणार याकडे सामान्य शिवसैनिकांच्या आणि राजकीय क्षेत्राच्या नजरा लागल्या आहेत.