नवाब मलिकांना विधान करण्यापासून रोखण्यास न्यायालयाचा नकार, मलिक म्हणाले…

Nawab-Malik and dyandev wankhede1

मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांना एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील आणि त्यांच्या कुटुंबाविरोधात पोस्ट टाकण्यास मनाई करण्यास नकार दिला. मात्र सोशल मिडियावर माहिती पोस्ट करताना माहितीची पडताळणी करावी, असे सांगितले. खात्री केल्याशिवाय मलिकांना पोस्ट करू नये असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे. तसेच नवाब मलिकांनी दोन आठवड्यांत हायकोर्टात आपलं प्रतिउत्तर सादर करावे, अशाही सूचना हायकोर्टाने दिल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयात या प्रकरणातील पुढील सुनावणी ही 20 डिसेंबरला होणार आहे. नवाब मलिक यांनीही न्यायालयाच्या या निकालावर प्रतिक्रिया देत एक ट्विट केले आहे.

समीर वानखेडे यांचे वडिल ज्ञानदेव वानखेडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल करत नवाब मलिक यांनी ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटूंबीयांविरोधात पोस्ट टाकण्यासाठी मनाई करणारी याचिका दाखल केली होती. सोशल मिडियावर याबाबतची माहिती पोस्ट करण्यासाठी मज्जाव करणारी ही याचिका होती. याचिकेदरम्यान न्यायालयाने नवाब मलिकांना न्यायालयाला पुरावे सादर करावेत असेही आदेश दिले होते. त्यानुसार नवाब मलिक यांनी कोर्टासमोर पुरावे सादर केले होते. समीर वानखेडे यांच्या जातीशी तसेच धर्माशी संबंधित अनेक कागदपत्रे नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर तसेच पत्रकार परिषदेतून मांडली आहेत. आज समोवारीही नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या लग्नाशी संबंधित काही फोटो ट्विट केले. त्याआधी नवाब मलिक यांची मुलगी निलोफरनेही समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाची पत्रिका शेअर केली होती. तसेच समीर वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्याची प्रमाणपत्रेही नवाब मलिक यांनी गेल्या काही दिवसात ट्विटरवर शेअर केली आहेत. त्यामध्ये ज्ञानदेव वानखेडे यांच्याशी संबंधित काही प्रमाणपत्रांचाही समावेश आहे. पण आज सोमवारी झालेल्या सुनावणीत समीर वानखेडे आणि त्यांच्या कुटूंबीयांशी संबंधित कोणत्याही व्यक्तीबाबत सोशल मिडियावर पोस्ट करण्यास मज्जाव करणाऱ्या याचिकेवर ज्ञानदेव वानखेडेंना कोणताही दिलासा देण्यासाठी न्यायालयाने नकार दिला.

नवाब मलिक म्हणतात…

नवाब मलिक यांनी न्यायालयात झालेल्या सुनावणीनंतर एक ट्विट केले आहे. नवाब मलिक यांनी आपल्या ट्विटमध्ये सत्यमेव जयते म्हटले आहे. तसेच अन्याय के खिलाफ हमारी जंग जारी रहेगी असेही नवाब मलिक यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. त्यामुळे नवाब मलिक यांचा क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील तसेच समीर वानखेडे यांच्या धर्म आणि जात प्रमाणपत्राच्या बाबतीतला लढा कायम सुरू राहणार हे नक्की. कोर्टाच्या आजच्या सुनावणीत त्यांच्या लढ्याला एकप्रकारे बळच दिले आहे.


नवाब मलिकांनी समीर वानखेडेंच्या ‘निकाह’चा केला फोटो शेअर