e-Shivneri Bus : एसटी महामंडळासाठी ई-शिवनेरी ठरतेय फायद्याची

1 मे ला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई- शिवनेरी बसचे लोकार्पण करण्यात आले. पण दोन दिवसांतच या बसमुळे महामंडळाला फायदा झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

E-Shivneri is proving beneficial for ST Corporation

महाराष्ट्र शासनाच्या वाहनांमधून प्रवास करताना प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी 2015 मध्ये शिवनेरी बसेस सुरू करण्यात आल्या. या बसेसमधून प्रवास करण्याला नागरिकांनी पसंती दिल्याने आता ई-शिवनेरी बसेस देखील एसटी महामंडळाच्या ताफ्यात आणण्यात आलेल्या आहेत. 1 मे ला महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ई-बसचे लोकार्पण करण्यात आले. पण दोन दिवसांतच या बसमुळे महामंडळाला फायदा झाला असल्याचे सांगण्यात आले आहे.

हेही वाचा – स्कर्टवर फोटो काढला तर थेट ३ वर्षांचा तुरुंगवास, ‘या’ देशात आदेश जारी

महामंडळाच्या ताफ्यातील पहिली ई-शिवनेरी बस ही ठाणे-पुणे-ठाणे मार्गावर सुरू करण्यात आलेली आहे. दोन दिवसांत या बसच्या दोन फेऱ्या झाल्या असून 98 प्रवाशांनी प्रवास केला आहे. तर यामुळे 42 हजार 705 रुपयांचे मिळाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे दोन दिवसांत झालेल्या या नफ्यामुळे एसटी महामंडळाला याचा पुढे देखील फायदा होऊ शकतो, असे सांगण्यात येत आहे.

महामंडळाच्या ताफ्यात येणार 100 ई-बसेस
एसटी महामंडळाच्या ताफ्यात लवकरच 100 ई-शिवनेरी बसेस दाखल होणार आहेत. यातील आठ बसेस आलेल्या आहेत. यातील पहिल्या बसेसचे मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे. इंधनावरील खर्च कमी करण्यासाठी आणि वाढते प्रदुषण रोखण्यासाठी महामंडळाकडून या बसेस महामंडळाच्या ताफ्यात दाखल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

ईलेक्ट्रिक शिवनेरी बसची वैशिष्ट्ये
एसटी महामंडळाच्या ताफ्यात दाखल झालेल्या ई-शिवनेरी बसेसमध्ये संपूर्ण वातानुकूलित यंत्रणा, आरामदायी आसने, प्रत्येक प्रवाशासाठी मोबाइल चार्जिंग आणि प्रकाशदिवे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. बॅग ठेवण्यासाठी बसच्या बाजूला स्वतंत्र व्यवस्था आहे. बसमध्ये 43 प्रवासी बसू शकतात. एकदा बॅटरी संपूर्ण चार्ज केल्यावर 300 किलोमीटरचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे. ईलेक्ट्रिक बसमुळे प्रदूषणमुक्त प्रवास होतो आणि इंधनावरील खर्च कमी करण्यास मदत होते. आरामदायी प्रवास होतो आणि या बसचा रस्त्यावर धावतांना आवाजही येत नाही. या शिवाय प्रवाशांच्या सुरक्षेवरही भर देण्यात आलेला आहे.