घरमहाराष्ट्रपहाटेचा शपथविधी : फडणवीसांनी दिले होते संकेत, जयंत पाटलांनी केले उघड

पहाटेचा शपथविधी : फडणवीसांनी दिले होते संकेत, जयंत पाटलांनी केले उघड

Subscribe

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे आजही भाजपासोबतच आहेत, असा खळबळजनक दावा वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. त्या पाठोपाठ, पहाटेचा शपधविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, असे खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजपा आणि शरद पवार यांच्यातील ‘छुपे’ सुमधूर संबंध पुन्हा एकदा समोर आले आहेत. एवढंच नव्हे तर, दोन वर्षांपूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही याबाबत खुलासा केला होता.

२३ जून २०२० रोजी ज्येष्ठ पत्रकार राजू परुळेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली होती. त्यावेळी पहाटेच्या शपथविधीवरून फडणवीसांना छेडलं होतं. “दोन वर्षांपूर्वी राष्ट्रवादी आणि भाजप सोबत येणार होते, त्यावेळी पंतप्रधानांनी सांगितलं की, राष्ट्रवादीला सोबत घ्यायचं असेल तर शिवसेनेलादेखील सोबत घेतलं पाहिजेच. इतकं स्पष्ट अमित शाह यांनी शरद पवार यांना देखील सांगितलं होतं. त्यावेळी राष्ट्रवादीला आम्ही सोबत घेतलं नाही. राष्ट्रवादी पूर्णपणे आमच्यासोबत यायला तयार होती, असा गौप्यस्फोट देवेंद्र फडणवीसांनी या मुलाखतीत केला होता.

- Advertisement -

‘राष्ट्रवादी’ म्हणजे ‘अजित पवार’ नाही. मी त्या सर्व चर्चेत होतो. त्यानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुखांनी भूमिका बदलली. त्यानंतर आम्ही शांत झालो. तीन चार दिवस आम्ही कुठलीही हालचाल केली नाही. पण नंतर आम्हाला अजित पवार यांच्याकडून फिगर आली. त्यांनी सांगितलं की, तीन पक्षांचं हे सरकार चालू शकत नाही. म्हणून सकाळी तो शपथविधी झाला, अशीही स्पष्टोक्ती फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीबाबत केली होती. त्यामुळे पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवार असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं.

महाविकास आघाडीच्या काळात कोरोनाचा उद्रेक झाला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी घरातूनच सरकार चालवले. त्यामुळे ते टीकेचे धनी बनले. एवढंच नव्हे तर, महाविकास आघाडी सरकारचं नियंत्रण शरद पवारांच्या हाती असल्याचंही म्हटलं जात होतं. मात्र, २०२२ मध्ये शिवसेनेच्या आमदारांनी बंड केलं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं. या बंडामागेही शरद पवारांचाच हात असल्याचीही दबक्या आवाजात चर्चा आहे.

- Advertisement -

ही चर्चा सुरू असतानाच राज्यात शिवसेना आणि भीमशक्ती यांची युती झाली. शरद पवार आणि वंचितचे प्रकाश आंबेडकर यांच्यात राजकीय मतभेद आहेत. म्हणूनच, महाविकास आघाडीतीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेला वंचितसोबतची युती जाहीर करायला वेळ लागला. मात्र, युती जाहीर होताच प्रकाश आंबेडकरांनी शरद पवारांवर निशाणा साधला. शरद पवार आजही भाजपाचेच आहेत, असा खळबळजनक दावा आंबेडकरांनी केला. जयंत पाटलांनीही पहाटेच्या शपथविधीमागे शरद पवारांचा हात असू शकतो, असे सांगत आंबेडकरांच्या दाव्याला एक प्रकारे दुजोराच दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत असूनही शरद पवारांचा भाजपाला छुपा पाठिंबा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -