गडचिरोली : भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया या तीन जिल्ह्यांमध्ये आज बुधवारी (ता. 04 डिसेंबर) सकाळीच भूकंपाचे धक्के जाणवले आहे. साधारणतः सकाळी 07.27 वाजता हे भूकंपाचे धक्के जाणवल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्र यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, तेलंगणा राज्यातील मुलुगू हे भूकंपाचे केंद्रस्थान आहे. तर या भूकंपाची तीव्रता 5.3 रिश्टर स्केल असल्याची सांगण्यात आले आह. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी किंवा वित्तहानी झालेली नाही. (Earthquake in East Vidarbha epicenter found in Telangana)
मिळालेल्या माहितीनुसार, गडचिरोली जिल्ह्यातील कोरची, अहेरी, सिरोंचा या ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले. हे भूकंपाचे धक्के जास्त तीव्रतेचे नसले तरी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तसेच छत्तीसगड राज्यातील भूपालपटनम येथेही नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. याशिवाय, भंडारा जिल्ह्यातील काही भागांमध्ये तसेच गोंदियातील काही परिसरामध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. सकाळी 7.30 च्या सुमारास जमीन अचानक हादरू लागली. भूकंप होत असल्याचे जाणवताच नागरिकांमध्ये घबराट पसरली आणि जीव वाचवण्यासाठी अनेकांनी घराबाहेर धाव घेतली.
हेही वाचा… Cyclone Fengal Effect : यामुळे राज्यातून गुलाबी थंडी गायब; मुंबई शहरात पावसाचा शिडकावा
अशा प्रकारचे धक्के पुन्हा जाणवल्यास नागरिकांनी दक्षता घ्यावी व घाबरून न जाता इमारती बाहेर मोकळ्या जागेत सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय दैने यांनी केले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी राष्ट्रीय भूकंप शास्त्र केंद्र यांच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन माहिती घेता येईल, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
तर, चंद्रपूर – गडचिरोली जिल्ह्याला लागून तेलंगणा राज्याची सीमा आहे. हा भाग गोदावरी फॉल्ट भूकंप क्षेत्र म्हणून ओळखला जातो. येथे जेव्हा जेव्हा भूकंप होतात, तेव्हा गडचिरोली चंद्रपूर जिल्ह्यातील सीमावर्तित भागात याची मोठी झळ बसते. साधारणतः 10 वर्षांपूर्वी असेच धक्के गोंडपिपरी तालुक्यातील नंदवर्धन परिसरात बसले होते. अनेकांनी गाव घरे दारे सोडून मोकळ्या भागात आपले बस्तान बसवले होते.