घरठाणेशहापूरकर भूकंपाच्या धक्क्याच्या सावटाखाली, भूकंपग्रस्त गावात कापडी तंबू

शहापूरकर भूकंपाच्या धक्क्याच्या सावटाखाली, भूकंपग्रस्त गावात कापडी तंबू

Subscribe

शहापूर :  गेल्या आठ दिवसांपासून बसणाऱ्या भूकंपाच्या धक्क्यांनी वेहळोलीसह परिसरातील गाव पाड्यांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. वेहळोली गावातील काही घरांना भूकंपाच्या धक्क्यांनी तडे गेले असून खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी कापडी तंबू बांधण्यात आला आहे. ‘सावध रहा’ असा सल्ला देऊन धोकादायक घरातील आबालवृद्धांनी रात्री कापडी तंबू मध्ये निवारा घ्यावा तसेच रात्री घरात न झोपता अंगणात झोपावे, असे आवाहन महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी वेहळोली व परिसराची पाहणी करीत असताना ग्रामस्थांना केले.

विशेष म्हणजे वेहळोली येथे घरांची पाहणी करीत असतानाच उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांना भूकंपाच्या सौम्य धक्क्याचा प्रत्यक्ष अनुभव आला. शहापूर तालुक्यातील वेहळोली व परिसरातील गाव पाडे  भूकंपाचे सौम्य धक्क्यांनी हादरले आहे. २.०७ रिष्टर स्केल इतक्या धक्क्याची नोंद झाली असून तालुक्यातील सोगाव केंद्रबिंदू असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.  भूकंपाचे धक्के बसणारे शहापूर तालुक्यातील गाव पाडे महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांनी गुरुवारी पालथे घालून ग्रामस्थांना धीर दिला. वेहळोलीसह हरणेपाडा, सासेपाडा, कातकरीवाडी, कानडी, खरीवली, शिवाजीनगर (किन्हवली) यांसह भूकंपाचे धक्के बसणाऱ्या परिसरातील गावपड्यांमधील ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. भूकंप होणार नाही अशी सकारात्मक भावना ठेऊन सावध राहण्याचा सल्ला दिला. ग्रामस्थांना रात्री घरात न झोपता बाहेर झोपण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

वेहळोली येथील काही घरांना तडे गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून याठिकाणी कापडी तंबू बांधण्यात आला आहे. या तंबूत पलंग, गाद्यांची व्यवस्था करण्यात आली असून धोकादायक स्थितीत असलेल्या घरातील आबालवृद्धांनी रात्री झोपण्यासाठी या तंबूचा निवारा घ्यावा तसेच इतर घरातील ग्रामस्थ महिला भगिनींनी देखील घरात न झोपता सावधगिरी बाळगून अंगणात झोपण्याचे आवाहन केले आहे. गुरुवारी वेहळोली येथील भूकंपाने तडे गेलेल्या घरांची पहाणी करत असतानाच संध्याकाळी पाच च्या सुमारास भूकंपाच्या सौम्य धक्क्याचा अनुभव उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांसह त्यांच्या सोबत असलेल्या महसूल अधिकारी, कर्मचारी व ग्रामस्थांनी घेतला. यावेळी बाळासाहेब वाकचौरे यांसह गटविकास अधिकारी भास्कर रेंगडे, मंडळ अधिकारी शंकर डामसे, तलाठी राकेश घोलप, गणेश विशे, काशीराम लोणारे, ग्रामसेवक अभय भेरे आदी उपस्थित होते.


हेही वाचा : मातोश्री’वर सिनेट सदस्य वाढविण्यासाठी माजी नगरसेवकांची महत्त्वपूर्ण बैठक

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -