घरताज्या घडामोडीपक्षीय भूकंपाचे हादरे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरेंच्या खुर्चीलाही...

पक्षीय भूकंपाचे हादरे शिवसेना पक्षप्रमुख ठाकरेंच्या खुर्चीलाही…

Subscribe

गेल्या चार वर्षांत मातोश्रीच्या दरबारात आणि दोन वर्षे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात विलक्षण वजन वाढलेल्या शिवसेना नेते, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीच्या अनधिकृत बंगल्याबाबत किरीट सोमय्या यांना अत्यंत महत्वाची माहिती सेनानेत्यानेच दिल्याबाबतच्या दबक्या चर्चेला शनिवारी व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपने बळकटी मिळाली आहे. शिवसेना नेते, माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी किरीट सोमय्या यांना परब यांच्या अनधिकृत बंगल्याची माहिती दिल्याची क्लिप व्हायरल झाल्यावर शिवसेनेमध्ये पक्षीय भूकंप झाला असला तरी त्याचे राजकीय हादरे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या खुर्चीलाही बसणार आहेत. कदम-परब यांच्यातल्या वितुष्टाला भावकीच्या वादाची किनार असली तरी शिवसेनेत त्या त्या भागातील नेत्यांमधील वाद आणि संघर्ष यांची मोठी परंपरा आहे.

शिवसेनेत स्थापनेपासून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नेतृत्व सर्वमान्य आणि सर्व स्वीकृत असले तरी सुरुवातीच्या काही टप्प्यात त्यांनाही आव्हान देण्याचा प्रयत्न काही नेतेमंडळींनी केला होता. त्याच वेळी शिवसैनिकांनी आणि पक्षानेही या नेत्यांना अक्षरशः वाळीत टाकत पक्षाबाहेरची वाट दाखवली. त्यानंतर शिवसेनेत स्पर्धेच्या राजकारणात प्रभावशाली होण्यासाठी वाद आणि संघर्ष पाहायला मिळाला आहे. दादरमध्ये शिवसेना नेते मनोहर जोशी आणि दिवाकर रावते यांच्यामध्ये वर्चस्वासाठी संघर्ष होत होता. यामध्ये मनोहर जोशी सरस ठरले आणि राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ब्राह्मण समाजातील असूनही बसण्याचा मान त्यांनी मिळवला.

- Advertisement -

शिवसेनाप्रमुखांचे निवासस्थान असलेल्या मातोश्रीच्या परिसरात माजी खासदार मधुकर सरपोतदार आणि श्रीकांत सरमळकर यांच्यामध्ये तर विळ्याभोपळ्याचा वैर होतो. सरपोतदार हे उच्चशिक्षित होते, तरी बाळासाहेब ठाकरे यांचे अंगरक्षक असलेल्या श्रीकांत सरमळकर यांनी त्यांना प्रत्येक वेळेस हैराण करून सोडले होते. आज श्रीकांत सरमळकर अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत आहेत. काही काळाने सरमळकर-अनिल परब यांच्यात अक्षरश: साप मुंगुसाची लढाई जुंपली होती. वांद्य्रातील ‘मातोश्री’चे दरवाजे आपल्यासाठी उघडे ठेवण्याकरता हा संघर्ष होता. या संघर्षात सरमळकर यांच्यानंतर बाळा सावंत यांनी बाजी मारली होती.

बाळा सावंत यांच्या अकाली निधनानंतर त्यांची पत्नी तृप्ती सावंत यांच्याबरोबरही परब यांचे वैर होते. या वैरातूनच तृप्ती सावंत यांचे मागच्या विधानसभेत तिकीट कापण्यात आले. सरकार दरबारी असलेली कागदपत्रांची लढाई आणि निवडणुकांमधल्या संसदीय खाचाखोचांबाबत माहीर असलेले सुभाष देसाई आणि गजानन कीर्तीकर यांच्यामध्येही ताणतणाव होता. यापैकी सुभाष देसाई यांनी बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे आणि त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्या बरोबरच्या ताळमेळाची आपली भट्टी अत्यंत कुशलतेने जमवलेली. गजानन कीर्तीकर यांना मात्र ती किमया साधता आलेली नाही. स्थानीय लोकाधिकार समितीच्या माध्यमातून पांढरपेशा वर्गाचे नेते म्हणून गजानन कीर्तीकर ओळखले जात असले तरी कीर्तीकर-देसाई वादात अनेकांची होरपळ झालेली विसरता येणार नाही. ‘मातोश्री’चा रेड कार्पेट तेव्हा देसाईंच्याच वाट्याला आला. सुभाष देसाई आणि रामदास कदम यांच्यामध्येही संघर्ष होता. अर्थात तो संसदीय प्रक्रियेमध्ये वरचढ कोण ठरणार यासाठीचा होता.

- Advertisement -

शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात जर शिवसैनिकांचे प्रेम आणि आदर जर कोणाच्या वाट्याला आला असेल तर तो स्वर्गीय आनंद दिघे यांच्या. आनंद दिघे यांची कार्यशैली आणि संघटन कौशल्य याबद्दल आजही अनेक दाखले आणि सुरस कथा सांगितल्या जातात. याच दिघे यांच्याबरोबर कधीकाळी कामगार नेते असलेल्या आणि नंतर नवी मुंबईमध्ये निर्विवादरित्या ‘दादा’ ठरलेल्या गणेश नाईक यांच्यामध्ये प्रचंड ताण होता. याच राजकीय संघर्षातून गणेश नाईक यांना मात देण्यासाठी दिघे यांनी अत्यंत सुमार असलेले सीताराम भोईर या कार्यकर्त्याला निवडणुकीत तिकीट देऊन गणेश नाईक यांचा राजकीय काटा काढण्याचा यशस्वी प्रयत्न केला होता. यात आनंद दिघे यांचे तात्विक वाद माजी खासदार सतीश प्रधान यांच्याबरोबरही होते.

अनेक गरजू आनंद दिघे यांच्या पाया पडल्यानंतर त्यांच्या समस्या दूर होत. या गोष्टीचे भांडवल करत प्रधान यांनी कृपया माझ्या कोणी पाया पडू नये, अशा स्वरूपाची पाटीच आपल्या कार्यालयावर लावून आनंद दिघे यांच्याबरोबर पंगा घेतला होता. आनंद दिघे यांचे धक्कादायकरित्या निधन झाल्यानंतर ठाण्याच्या गडाचा सुभेदार होण्यासाठी अनेकांनी आपली कंबर कसली. त्यामध्ये मुंबईतील अनेक नेत्यांनीही आपले नशीब अजमावून पाहिले; पण सगळ्यांच्या पदरी निराशा आल्यानंतर दिघे यांचा विश्वासू असलेले एकनाथ शिंदे यांच्याकडे या गडाची सुभेदारी देण्यात आली. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दिघे यांच्या तालमीत तयार झालेल्या राजन विचारे यांनी सुरुवातीला पंगा घेतला. मात्र, विचारे यांची क्षमता लक्षात घेत ‘मातोश्री’नेही शिंदेंचा मार्ग मोकळा केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -