चित्रा रामकृष्ण यांना ईडीकडून अटक,संजय पांडेंविरोधातही गुन्हा दाखल

फोन टॅपिंग प्रकरणात राष्ट्रीय शेअर बाजारा (एनएसई)च्या माजी व्यवस्थापकीय संचालिका चित्रा रामकृष्ण यांना अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने गुरुवारी अटक केली. चित्रा यांना अटक केल्यानंतर न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे, तर याचप्रकरणी ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह एनएसईच्या माजी अधिकार्‍यांविरोधात आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

एनएसईचे एकेकाळचे वरिष्ठ अधिकारी असलेल्या रवी नारायण यांच्या नावाचाही यात समावेश आहे. ईडीने या सगळ्यांविरोधात पीएमएलए अ‍ॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयनेही गेल्या आठवड्यात याप्रकरणाशी संबंधित गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयने केलेल्या आरोपानुसार नारायण आणि रामकृष्ण यांनी मुंबईचे सेवानिवृत्त पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या एका कंपनीला शेअर बाजारातील कर्मचार्‍यांचे फोन कॉल बेकायदेशीररित्या टॅप करण्याचे काम दिले होते.

एनएसईचे काही कर्मचारी गोपनीय माहिती बाहेर देत होते, असा संशय चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांना होता. त्यामुळे त्यांनी २००९ ते २०१७ या सालापर्यंत संजय पांडे यांच्याशी संबंधित आयसेक सर्व्हिसेस प्रा. लि. या कंपनीला एनएसईच्या सॉफ्टवेअरशी संबंधित लेखापरीक्षणाची जबाबदारी सोपविली होती, असा दावा ईडीतर्फे करण्यात आला आहे.