साई रिसॉर्ट अखेर भोवले; सदानंद कदमांना ईडीकडून अटक

sai resort

मुंबईः दापोली येथील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) शुक्रवारी सदानंद कदम यांना अटक केली. सदानंद कदम हे माजी आमदार रामदास कदम यांचे बंधू आहेत. रामदास कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे समर्थक आहेत. तर या रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना अटक होणार असे भाकीत भाजप नेते किरीट सोमय्या वारंवार करत आहेत. अनिल परब हे उद्धव ठाकरे यांचे समर्थक आहेत. परब यांना अटक न होता भाजप सोबत सत्तेत असलेल्या शिंदे गटाच्या आमदाराच्या भावालाच अटक झालयाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

साई रिसॉर्ट प्रकरणी शुक्रवारी सकाळी साडेसात वाजता खेडच्या कुडोशी येथे अनिकेत फार्म हाऊस या सदानंद कदम यांच्या निवासस्थानी ईडीचे पथक दाखल झाले. सदानंद कदम यांना ताब्यात घेऊन हे पथक मुंबईच्या दिशेने रवाना झाले. मुंबईतील ईडी कार्यालयात सदानंद कदम यांची चौकशी झाली. संध्याकाळी ईडीने त्यांना अटक केली. उद्या, शनिवारी सदानंद कदम यांना न्यायालयात हजर केले जाईल. चौकशीसाठी त्यांची कोठडी मिळावी याकरिता ईडी न्यायालयात अर्ज करणार आहे. त्यामुळे कदम यांना किती दिवसांची ईडी कोठडी मिळते हे बघावे लागेल.

दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. अनिल परब यांच्यावर शासनाचा महसूल बुडवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.भाजप नेते किरीट सोमय्या यांच्याकडून सातत्याने अनिल परब यांच्यावर आरोप होत आहे. परब यांनी फसवणूक करत बनावट कागदपत्रांच्या आधारे हे रिसॉर्ट बांधल्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. जमीन खरेदी केल्यानंतर दोन वर्षांनी 2019 मध्ये याची नोंदणी झाली आणि त्यानंतर 2020 मध्ये ही जमीन मुंबईतील केबल ऑपरेटर आणि शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदम यांचे बंधू सदानंद कदम यांना ही जमीन 1.10 कोटींना विकण्यात आली, असा आरोप आहे. दरम्यान किरीट सोमय्यांकडून हे रिसॉर्ट पाडण्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरु आहे. रिसॉर्टच्या बांधकामातून पर्यावरण नियमांचे उल्लंघन झाले आहे. त्यामुळे परब यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे.