परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर, शासकीय आणि खासगी निवासस्थानासह ७ ठिकाणी छापेमारी

Anil Parab responded after the ED inquiry
सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात करीन, आजची चौकशी रिसॉर्टबाबत - अनिल परब

शिवसेनेचे बडे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब ईडीच्या रडारवर आहेत. शिवसेना पक्ष प्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासातले नेते म्हणून अनिल परब यांना ओळखले जाते. परिवहन विभागातील बदल्या आणि अनधिकृत रिसॉर्टसह आणखी काही प्रकरणांमध्ये अनिल परब यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत. त्यांच्या राहत्या घरी आणि शासकीय निवासस्थानासह एकूण ७ जागांवर ईडीने छापेमारी केली आहे. सकाळीच ईडीने छापेमारी केली आहे. दरम्यान भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी अनिल परब यांना यापूर्वीच कारवाई होणार असल्याचा इशारा दिला होता. मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल परब यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.

शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित ७ ठिकाणी ईडीने छापेमारी केली आहे. मुंबईतील शासकीय आणि खासगी निवासस्थानी ईडीच्या पथकाने छापेमारी केली आहे. ईडीकडून अनिल परब यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनेक प्रकरणांवर परब यांची चौकशी सुरु आहे. परंतु माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि सचिन वाझे यांच्यासंबंधित प्रकरण तसेच रिसॉर्टशी संबंधित प्रकरणामुळे अनिल परब यांच्या घरावर छापेमारी करण्यात आली आहे.

मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. अनिल परब यांच्यावर पोलिसांच्या बदल्यांमध्ये घोटाळा केल्याचा आरोप सचिन वाझेने केले आहेत. अनिल देशमुख आणि अनिल परब यांना पोलीस बदल्यांमधील पैसे दिले असल्याचा जबाब सचिन वाझेने दिला आहे. यामुळे अनिल परब अडचणीत आले आहेत. परंतु महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप शिवसेनेच्या नेत्यांकडून करण्यात आला आहे.

दापोली रिसॉर्ट प्रकरणी छापेमारी

शिवसेना नेते अनिल परब यांच्या घरी ईडीने छापेमारी केल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी केंद्राकडून सुडबुद्धीने कारवाई सुरु असल्याचा आरोप होतोय. परब यांच्याविरोधात सदानंद कदम यांच्या सीएने चौकशीदरम्यान माहिती दिली आहे. यानंतर ईडीने कारवाई केली आहे. दापोलीची जागा १ कोटीला घेण्यात आली. ती घेताना अधिकृत पैसे दिले आहेत. परंतु बांधकामासाठी ७ ते ८ कोटींचा खर्च लागणार होता. परंतु कागदोपत्री केवळ १ कोटी रुपयांचा व्यवहार दाखवला आहे. यामुळे ईडीने कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.


हेही वाचा : मुश्रीफांच्या बेनामी संपत्तीवर लवकरच कारवाई तर अनिल परबांचे काऊंटडाऊन सुरु, सोमय्यांचा इशारा