ईडीला पूर्ण सहकार्य; मॅरेथॉन चौकशीनंतर संजय राऊतांची माहिती

shivsena mla sanjay raut on eknath shinde shivsena mla security maharashtra politics

मुंबई : सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची आज सुमारे 10 तास चौकशी केली. पत्राचाळ घोटाळा प्रकरणात ईडीने पाचारण केले होते. विशेष म्हणजे, बुधवारी महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर लगेच दोन दोन दिवसांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत ईडी चौकशीला सामोरे गेले.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील जवळपास 50 आमदारांनी पाठिंबा काढून घेतल्याने ठाकरे सरकार बुधवारी कोसळले. गुरुवारी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. गेले 10-12 दिवस सुरू असलेल्या या राजकीय घडामोडींमध्ये संजय राऊत यांनी शिवसेनेची भूमिका आक्रमकपणे मांडली होती. त्यानंतर लगेचच ते ईडी चौकशीला सामोरे गेले.

आज सकाळी 11.30च्या सुमारास ते ईडी कार्यालयात दाखल झाले. रात्री सुमारे पावणेदहाच्या सुमारास ते कार्यालयातून बाहेर आले. ईडी ही केंद्र सरकारच्या अखत्यारितील यंत्रणा असून त्यांच्या मनात काही शंका असतील तर त्या दूर केल्या पाहिजेत, माझ्याकडून पूर्ण सहकार्य केलेले आहे, असे शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.

काय आहे पत्राचाळ घोटाळा?
मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि म्हाडाचा भूखंड आहे. पत्रा चाळीत 3 हजार फ्लॅट बांधण्याचे काम प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते. त्यापैकी 672 फ्लॅट भाडेकरांसाठी राखीव ठेवण्यात आले होते तर बाकीचे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते. मात्र, 2011 ते 2013 सालांमध्ये प्रवीण राऊत यांनी चाळीचे अनेक भाग खासगी बिल्डर्सना विकल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात ईडीने संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक केली आहे. यासंदर्भात केलेल्या कारवाईदरम्यान प्रवीण राऊत यांच्या जमिनी, संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचा दादर येथील फ्लॅट आणि वर्षा राऊत,स्वप्ना पाटकर यांच्या अलिबाग येथील जमिनी ईडीने ताब्यात घेतल्या आहेत. याशिवाय, 2010मध्ये प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधुरी यांच्याकडून वर्षा राऊत यांनी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या 83 लाख रुपये स्वीकारले, असे ईडीचे म्हणणे आहे.