घरमहाराष्ट्रअनिल परब यांची ईडीकडून १३ तास चौकशी, ७ ठिकाणी छापेमारी

अनिल परब यांची ईडीकडून १३ तास चौकशी, ७ ठिकाणी छापेमारी

Subscribe

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, राज्याचे परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी छापेमारी केल्याने राजकीय वातावरण खवळले. ईडी अधिकार्‍यांच्या पथकांनी अनिल परब यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानासह मुंबई, पुणे, रत्नागिरीसह ७ विविध ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू सहकारी, राज्याचे परिवहनमंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्याविरोधात सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) गुरुवारी छापेमारी केल्याने राजकीय वातावरण खवळले. ईडी अधिकार्‍यांच्या पथकांनी अनिल परब यांच्या मंत्रालयासमोरील शासकीय निवासस्थानासह मुंबई, पुणे, रत्नागिरीसह ७ विविध ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. १३ तासांच्या चौकशीनंतर अनिल परब यांना ईडीच्या अधिकार्‍यांनी गुरूवारी सोडले असले तरी परब यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. दरम्यान चौकशीनंतर परब हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला वर्षावर गेले असून मुख्यमंत्री आणि परब यांच्यात गुरूवारी उशीरा बैठक झाल्याचे समजते. ईडीच्या छापेमारीत महत्वाची कागदपत्र हाती लागली असून पुन्हा शुक्रवारी परिवहन मंत्री परब यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचे समजते. त्यांच्या निकटवर्तीयांचीही ईडीकडून कसून चौकशी करण्यात आली. परब यांची चौकशी अटकेतील पोलीस अधिकारी सचिन वाझे याच्या पत्रातील पोलीस बदल्यांच्या आर्थिक देवाणघेवाणवरून केल्याची माहीती ईडीच्या अधिकार्‍यांनी दिली.

राज्यातील बदल्यांमधील कथित भ्रष्टाचार आणि अनधिकृत रिसॉर्टसह विविध प्रकरणांमध्ये ईडीकडून ही कारवाई झाल्याची माहिती आहे. याआधी प्राप्तिकर विभागाकडूनही अनिल परब यांची चौकशी झाली होती. चौकशीदरम्यान अनिल परब यांच्याकडून अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्यानंतर काही दिवसांनी याप्रकरणी ईडीने अनिल परबांविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यामुळे अनिल परबांविरोधात लवकरच ईडीकडून कारवाई करण्यात येणार असल्याचे भाकित भाजप नेत्यांकडून वर्तविण्यात येत होते. त्यानंतर गुरुवारी पहाटे सात वाजता ईडीच्या अधिकार्‍यांनी अनिल परब यांच्या निवासस्थानासह छापेमारीला सुरुवात करताच यावरून राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजली. ईडीच्या अधिकार्‍यांनी छापेमारीला सुरुवात करताच मंत्री अनिल परब यांचे शासकीय निवासस्थान अजिंक्यतारा आणि वांद्रे येथील खासगी निवासस्थानाबाहेर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला. तसेच सीआरपीएफचे जवानही याठिकाणी तैनात करण्यात आले, तर अनिल परब यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत शिवसैनिकांनी या कारवाईचा तीव्र निषेध नोंदवला.

- Advertisement -

कुठे कुठे ईडीची छापेमारी?

  • परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परबांचा मंत्रालयासमोरील अजिंक्यतारा बंगला
  • अ‍ॅड. परब यांचे वांद्य्रातील खासगी निवासस्थान मोनार्क इमारत, ७वा मजला
  • अ‍ॅड. परब यांचे निकटवर्तीय पुण्यातील विभास साठे यांचे निवासस्थान
  • विभास साठे यांच्या कोथरुडमधील कार्यालयातही ईडीची छापेमारी
  • दापोली समुद्र किनार्‍यावरील साई रिसॉर्ट
  • शिवसेना पदाधिकारी संजय कदम यांचे अंधेरीतील निवासस्थान
  • परब यांचे निकटवर्तीय चेंबूरमधील बांधकाम व्यावसायिकाच्या घरी छापेमारी
  • अ‍ॅड. परब यांच्या सीएच्या घरावरही ईडीच्या अधिकार्‍यांनी छापा टाकला

अनिल परब यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा – सोमय्या
अनिल परब यांनी बोजा बिस्तरा तयार ठेवावा. अनिल परबांचा शेकडो कोटींचा घोटाळा आहे. २५ कोटींच्या बेनामी रिसॉर्ट प्रकरणात मुख्यमंत्र्यांचे बेनामी व्यवसाय चालवणार्‍या अनिल परबांना आता जावे लागणार आहे. २५ कोटींचें रिसॉर्ट बांधले तेसुद्धा स्वतःच्या नावावर, इलेक्ट्रिक कनेक्शन स्वतःच्या नावावर, स्वतः प्रॉपर्टी टॅक्स भरतो आणि मग त्या बांधकामाचा खर्च कोणी केला, १०० कोटींची सचिन वाझेची जी वसुली येत होती, त्यातही अनिल परबचे नाव होते. अनिल परबचे सगळे काळे कारनामे बाहेर येतील, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दिली.

- Advertisement -

 सर्व गोष्टींचा खुलासा न्यायालयामध्ये करेन – अनिल परब
याबाबत सर्व गोष्टींचा खुलासा न्यायालयात करेन. ईडीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी चौकशीदरम्यान दिली. कोणत्याही चौकशीला समोर जाण्यास तयार आहे. ईडीच्या अधिकार्‍यांनी घरावर छापे घातले. या मागचा गुन्हा काय? दापोली येथील साई रेसॉर्टचे मालक सदानंद कदम आहे. कोर्टात त्यांनी तसा दावा केला आहे. हे रिसॉर्ट अजून सुरू झालेले नाही. रिसॉर्टमधून सांडपाणी समुद्रात जात यावरुन गुन्हा दाखल केलेला आहे. तरीही साई रिसॉर्ट आणि माझ्या नावे नोटीस काढली, असा खुलासा परब यांनी यानंतर केला.

कारवायांमुळे भाजप रोज खड्ड्यात – राऊत
अनिल परब हे आमचे सहकारी आणि कडवट शिवसैनिक आहेत. अशा प्रकारच्या कारवाया गेल्या काही दिवसांपासून राजकीय सूडबुद्धीने सुरू आहेत. याच प्रकारचे आरोप अनिल परब आणि आमच्या इतर सहकार्‍यांवर लावले जात आहेत. त्यापेक्षा गंभीर प्रकारचे गुन्हे भाजपच्या लोकांवर आहेत, परंतु त्यांना कोणी हात लावत नाही. आम्ही सर्व पक्ष आणि सरकार अनिल परब यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहोत, असे शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार – एकनाथ शिंदे
मुंबई महापालिकेच्या होऊ घातलेल्या निडणुका डोळ्यांसमोर ठेवून अशा प्रकारच्या कारवाया करणे योग्य नाही. केंद्रीय तपास यंत्रणा या राजकीय सुडापाटी किंवा राजकीय फायद्यासाठी जेव्हा जेव्हा वापरल्या जातील, तेव्हा हा लोकशाहीचा एकप्रकारे गळा घोटण्याचा प्रकार आहे. शिवसेना कधीही अशा कारवायांना घाबरलेली नाही आणि घाबरणार नाही. कायदेशीररित्या लढा लढून त्याला उत्तर दिले जाईल, अशी प्रतिक्रिया नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -