संजय राऊतांची १० तासांहून अधिक काळ ईडी चौकशी

Sanjay Raut

शिवसेना प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांची अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी १० तासांहून जास्त काळ चौकशी केली. दुपारी ११.४५ वाजेच्या सुमारास संजय राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात पोहचले होते. गोरेगावच्या पत्राचाळ घोटाळाप्रकरणी त्यांची चौकशी करण्यात येत आहे. २ दिवसांपूर्वीच त्यांना ईडीकडून चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले होते. राज्यात चाललेल्या सत्तापालटाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी ईडीकडे वेळ मागितला होता.

शुक्रवारी राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मी ईडीसमोर हजर होऊन माझी भूमिका स्पष्ट करेल. मला पक्षाच्या कामांपासून रोखण्यासाठी, महाराष्ट्राच्या कामापासून रोखण्यासाठी हे सर्व दबावतंत्र सुरू आहे. या दबावांना बळी पडून आमचे काही लोक पळून गेले असले तरी मी ईडीसमोर हजर राहील. कोणत्याही प्रकारची कारवाई झाली तरी मी त्याला सामोरे जाईल. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहनदेखील केल्याचे राऊत यांनी सांगितले.

गोरेगाव पश्चिमेकडील म्हाडाच्या पत्राचाळ विकसित करण्याचे काम प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला देण्यात आले होते, परंतु त्यांनी या चाळीचा काही भाग खासगी बिल्डरांना विकल्याचा ईडीचा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्या कंपनीला पत्राचाळीतील ३ हजार फ्लॅट बांधण्याचे काम देण्यात आले होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट्स भाडेकरूंसाठी राखीव ठेवण्यात आले होते, तर बाकीचे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घेण्यात येणार होते, मात्र २०११ ते २०१३ दरम्यान प्रवीण राऊत यांनी चाळीचे अनेक भाग खासगी बिल्डर्सना विकत म्हाडा तसेच रहिवाशांची १,०३४ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.