Homeमहाराष्ट्रTorres Scam : फसवणूक प्रकरणी ईडीची मुंबई आणि जयपूरसह 10 ठिकाणी छापेमारी

Torres Scam : फसवणूक प्रकरणी ईडीची मुंबई आणि जयपूरसह 10 ठिकाणी छापेमारी

Subscribe

टोरेस कंपनीने कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवत अनेक गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार 20 दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकरणी आज ईडीने मोठी कारवाई करत मुंबई आणि जयपूरमध्ये छापेमारी केली आहे.

मुंबई : टोरेस कंपनीने गतवर्षी फेब्रुवारीमध्ये मुंबईतील दादरमध्ये पहिले कार्यालय उघडले होते. त्यानंतर गिरगाव, कांदिवली, कल्याण, सानपाडा, मीरा रोडमध्ये कार्यालय उघडत टोरेस कंपनीने कमी कालावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे अमिष दाखवत अनेक गुंतवणूकदारांची मोठी फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार 20 दिवसांपूर्वी उघडकीस आला होता. या प्रकारानंतर महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. या प्रकरणाचा तपास पोलिसांकडून करण्यात येत असला तरी आता ईडीची (अंमलबजावणी संचालनालय) एन्ट्री झाली आहे. ईडीने आज मोठी कारवाई करत मुंबई आणि जयपूरमध्ये छापेमारी केली आहे. (ED raids 10 places including Mumbai and Jaipur in Torres Company fraud case)

टोरेस कंपनीने कार्यालय उघडून पाँझी स्कीमच्या माध्यमातून लाखो गुंतवणूकदारांची तब्बल 1000 कोटींची आर्थिक फसवणूक केली आहे. या घोटाळ्याप्रकरणी आतापर्यंत 9 जणांना अटक करण्यात आली असून फरार असलेल्या मुख्य दोन आरोपींविरोधात लुक आऊट नोटीस जारी करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या प्रकरणी तपास सुरू असून विविध ठिकाणाहून 25 कोटींहून अधिक रकमेचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा – Ajit Pawar : शरद पवारांजवळील तुमची आसनव्यवस्था का बदलली? प्रश्न विचारताच अजितदादांच्या उत्तरानं हशा पिकला

पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच एपीएमसीमधील टोरेस कंपनी कार्यालयाचा पंचनामा करीत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण जवळपास 1 कोटी 90 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला आहे. सदरचा ऐवज हा तुर्भेतील टोरेस कार्यालयाच्या तळमजल्यात असलेल्या लॉकरमध्ये जमा करून ठेवला होता. याशिवाय टोरेसनं लकी ड्रॉ अंतर्गत वाटल्या जाणाऱ्या 14 महागड्या गाड्या देखील जप्त केल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे या प्रकरणात एन्ट्री झालेल्या ईडीने टोरेस ज्वेलरी फसवणुकीच्या संबंधित मुंबई आणि जयपूरमधील दहा ठिकाणी छापे टाकले आहेत. यासंदर्भातील वृत्त एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिले आहे.

गुंतवणूकदारांची कशी झाली फसवणूक?

दरम्यान, टोरेस कंपनीने सुरुवातीला मोजोनाईट नावाचा खडा खरेदी केलयावर त्यावर गुंतवणूक केल्यास दर आठवड्याला सहा टक्के व्याजदर देण्याचे आमिष दाखविले होते. त्यानंतर विविध आकर्षक योजना सुरू करून अनेकांना या योजनेत गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केले. सुरुवातीला अनेकांना व्याजदराची रक्कम देऊन त्यांचा विश्‍वास संपादन केला. महत्त्वाचे म्हणजे गुंतवणूकदारांनी इतरांनाही गुंतवणुकीस प्रवृत्त केल्यास मोठ्या रक्कमेचे कमिशनचे आमिष दाखविण्यात आले होते. या आमिषाने कंपनीत गुंतवणूकदारांच्या परिचित व्यक्ती, नातेवाईक आणि मित्रमंडळीने कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. मात्र सुरुवातीला मूळ रक्कमेसह व्याजाची रक्कम दिल्यानंतर कंपनीने काही दिवसांपासून पैसे देणे बंद केले. हा प्रकार संशयास्पद वाटताच अनेक गुंतणुकदारांनी कंपनीच्या विविध शाखेत गर्दी केली.

हेही वाचा – Sharad Pawar : अजितदादांची ‘ती’ मागणी अन् शरद पवारांनी झटक्यात केली मान्य