घरमहाराष्ट्रमाजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील घरांवर ईडीचा छापा

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर, मुंबईतील घरांवर ईडीचा छापा

Subscribe

माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांच्या नागपूरमधील घरावर सक्तवसुली संचालनायलयाने (ईडी) छापा मारला आहे. शुक्रवारी सकाळी ईडीने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थानी तसंच त्यांच्या निकटवर्तीयांकडे छापे टाकले. तसंच मुंबईतील वरळी मधील घरावर आणि गृहमंत्री असताना ज्या शासकीय निवासस्थानी राहत होते त्या ज्ञानेश्वरी बंगल्यावर देखील ईडीने छापे टाकले आहेत. ईडीच्या कारवाईमुळे देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्रीच मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात पोहोचले. शुक्रवारी सकाळी स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने मुंबईतील पथकाने देशमुख यांच्या जीपीओ चौकातील निवासस्थान तसेच त्यांच्या निकटवर्तीयांच्या घरी छापे टाकले. यावेळी पोलिसांचा प्रचंड ताफा ईडी अधिकाऱ्यांसोबत होता. १६ जूनला ईडीच्या तीन पथकांनी अनिल देशमुख यांच्याशी संबंधित दोन सीए व एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरीही छापे टाकले होते. ईडी देशमुख यांच्याकडेही झाडाझडती घेण्याची शक्यता या छाप्यांमुळे बळावली होती. अवघ्या नऊ दिवसातच ईडीने हा छापा टाकला आहे.

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसूल करण्याचे निर्देश दिल्याचे आरोप केले आहेत. यानंतर सीबीआयने देशमुख यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. कोलकाता येथे दोन बनावट कंपनीचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपनीद्वारे कोट्यवधी रुपयांचे व्यवहार झाले. ते देशमुखांशी संबंधित असल्याचा संशय सीबीआयला आला. त्यानंतर या प्रकरणात ईडी सक्रिय झाली. ईडीने गुन्हा दाखल केला. २५ मे रोजी ईडीच्या तीन पथकांनी अंबाझरीतील शिवाजीनगरमधील हरे कृष्ण अपार्टमेंट येथील सागर भटेवारा, सदरमधील न्यू कॉलनीतील समीत आयझॅक व गिट्टीखदानच्या जाफरनगरमधील कादरी बंधूंकडे छापे टाकले. तिघेही देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख यांचे मित्र आहेत.

सीबीआयने (CBI) २१ एप्रिल रोजी अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकून सलग ११ तास चौकशी केली होती. त्यावेळी सीबीआयने अनिल देशमुखांच्या घरातील काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्या ताब्यात घेतल्या होत्या. अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल करुन त्यांच्या घरावर छापेही मारण्यात आले होते.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -