घरमहाराष्ट्रआमदार प्रताप सरनाईकांच्या लोणावळा बंगल्यावर ईडीची धाड

आमदार प्रताप सरनाईकांच्या लोणावळा बंगल्यावर ईडीची धाड

Subscribe

सीसीटीव्ही फुटेज ताब्यात, अडचणीत वाढ

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या लोणावळा येथील डेला रिसॉर्टमध्ये असलेल्या बंगल्यावर सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी सकाळी छापेमारी करून काही सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असल्याची माहिती स्थानिक सूत्रांनी दिली. ईडीच्या या कारवाईमुळे आमदार प्रताप सरनाईक यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. एनएसईएल म्हणजेच नॅशनल स्पोर्ट्स एक्स्चेंज लिमिटेड प्रकरणात ही धाड टाकण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. याबाबत ईडीचे सहसंचालक सत्यब्रता कुमार यांच्याशी संपर्क साधला असता तपास सुरू असून याबाबत सध्या काही प्रतिक्रिया देणे उचित ठरणार नाही, असे ‘आपलं महानगर’शी बोलताना सांगितले. नॅशनल स्पोर्ट्स एक्स्चेंज लिमिटेड या प्रकरणात गेल्या महिन्यात ईडीकडून बांधकाम व्यावसायिक योगेश देशमुखला अटक करण्यात आली होती.

सुमारे 5.5 कोटींच्या सावकारीशी संबंधित हे प्रकरण असून या प्रकरणात सरनाईक यांची ईडीला चौकशी करायची होती. यापूर्वी बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांच्या मुलाची चौकशी केली होती. परंतु, नंतर हा तपास काहीसा थंडावला होता. मात्र, आता सरनाईक यांच्या डेला रिसॉर्टच्या आतमध्ये असलेल्या बंगल्यावर धाड टाकण्यात आली. पोलिसांना याबाबत ईडीने काहीही न कळवल्यामुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, ईडीची कारवाई असल्यामुळे स्थानिक पोलीस माघारी फिरले. ईडीच्या अधिकार्‍यांकडून रिसॉर्ट आणि बंगल्यात असलेली सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. यावेळी मागील काही महिन्यात कुणाकुणाचा वावर होता याचा शोध बहुतेक ईडीकडून घेतला जात असल्याचे स्थानिक सूत्रांनी सांगितले. काही तासाच्या शोध मोहिमेनंतर ईडीचे अधिकारी येथील सीसीटीव्ही फुटेज घेऊन गेल्याचे स्थानिक सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisement -

डेला रिसॉर्ट हे लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असून याबाबत लोणावळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ईडीने या छाप्याबाबत स्थानिक पोलिसांना कळवायला पाहिजे होते. मात्र, त्यांनी आम्हाला कुठलीही कल्पना दिली नव्हती. ईडीचे अधिकारी आले व त्यांनी डेला रिसॉर्टमध्ये असलेल्या आमदार सरनाईक यांच्या बंगल्याच्या बाहेर व आत काही शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यांनी येथील सीसीटीव्ही तपासले असून काही तासांनी ते येथून निघून गेले. डेला रिसॉर्ट मालकांनी मागील काही वर्षांपूर्वी रिसॉर्टच्या आतमध्ये बंगले बांधले असून त्यातील अनेक बंगले मुंबईतील उद्योजक आणि व्यावसायिकांना विकले आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये ईडीने सरनाईक यांच्या घर आणि कार्यालयावर छापेमारी केली होती. त्यानंतर ईडीने प्रताप सरनाईक आणि त्यांचा मुलगा विहंग यांचीही चौकशी केली होती. तत्पूर्वी ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी 25 नोव्हेंबरला अमित चांदोळेची कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळेला अटकही करण्यात आली होती. अमित चांदोळे हा प्रताप सरनाईक यांचा व्यावसायिक भागीदार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -