ईडीकडून प्रताप सरनाईकांची १०० कोटींची जमीन जप्त!

भाजप नेते किरीट सोमय्यांचा दावा

Kirit Somaiya's reply to Pratap Sarnaik We will not scared by your threats
तुमच्या धमक्यांना आम्ही घाबरणार नाही, किरीट सोमैय्या यांचे प्रताप सरनाईक यांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांची 78 एकर जमीन ईडीने जप्त केल्याचा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. टिटवाळ्याच्या गुरुवली येथे सरनाईक यांची 100 कोटी रुपये किमतीची ही जमीन असल्याचेही त्यांनी सांगितले.

किरीट सोमय्या हे रविवारी टिटवाळ्यातील गुरवली गावात आले होते. यावेळी त्यांनी विहंग आस्था हौसिंग कंपनीच्या जागांची पाहणी केली. प्रताप सरनाईक आणि मोहित अग्रवाल यांनी एनएसईएल घोटाळ्याचे 100 कोटी रुपये विहंग आस्था हौसिंग कंपनीत वळवले होते. त्यातून गुरवली येथे 112 जमिनी विकत घेण्यात आल्या होत्या. त्यातील 78.27 एकर जमिनीचा कालच ईडीने ताबा घेतला आहे. तसेच या जागेवर ईडीने आपले बोर्डही लावले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले. घोटाळ्यातील 100 कोटीची रक्कम परत न केल्यास अन्य मालमत्ताही जप्त केली जाईल, असा इशारा ईडीने सरनाईक यांना दिल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.

जमिनीचा कब्जा, ईडीचे बोर्ड

पीएमएलए कायद्यांतर्गत या जमिनींचा कब्जा ईडी, मुंबईने घेतला आहे. मनीलाँड्रींग विरोधी कायदा, 2002 च्या अंतर्गत या जमिनींचा ताबा अधिकृतरित्या घेण्यात आला आहे. या जमिनींवर अतिक्रमण करण्यास बंदी आहे. या जमिनीसंबंधी कोणीही कोणत्याही प्रकारचा आर्थिक व्यवहार करण्यात येऊ नये, असं या बोर्डावर ईडीने लिहिले असल्याचे सोमय्या यांनी सांगितले.

ठाकरे सरकारच्या दबावाला भीक घालत नाही

सरनाईक यांचा तिसरा घोटाळा मी बाहेर काढला आहे. ठाकरे सरकार घाबरले आहे. एकामागोमाग एक घोटाळे बाहेर पडत आहेत. औरंगजेबाचा जयजयकार करणार्‍या ठाकरे सरकारने विरोधकांवर दबाव आणण्यासाठी विरोधकांची सुरक्षा काढून घेतली आहे. विरोधी पक्ष ठाकरे सरकारच्या अशा प्रकारच्या कोणत्याही दबावाला भीक घालत नाही. आमच्या सुरक्षेपेक्षा जनतेची सुरक्षा महत्वाची आहे, असेही ते म्हणाले.