हसन मुश्रीफांना ईडीचं समन्स, पुढील आठवड्यात चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांना ईडीने समन्स बजावलं आहे. मागील दोन महिन्यात ईडीने त्यांच्यावर दुसऱ्यांदा छापेमारी केली आहे. आज झालेल्या छापेमारीमध्ये मुश्रीफ यांच्या कुटुंबीयांची कागलमधील निवासस्थानी तब्बल साडे नऊ तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर हे पथक दुपारी चार वाजेच्या सुमारास मुश्रीफांच्या घराबाहेर पडलं. ईडीच्या पथकाने येताना सोबत प्रिंटरही आणला होता. अधिकाऱ्यांनी सर्वांचा जबाब नोंदवून घेतला आहे.

हसन मुश्रीफ यांना येत्या सोमवारी म्हणजेच १३ मार्चला ईडी कार्यालयात हजर राहण्याची सूचना समन्सच्या माध्यमातून देण्यात आली आहे. त्यामुळे या समन्सनंतर मुश्रीफ यांना चौकशीला सामोरे जावे लागणार आहे. मुश्रीफ यांच्या अडचणीत वाढ झाल्यानंतर ते ईडी चौकशीला हजर राहणार की नाही?, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हसन मुश्रीफ यांना याआधीदेखील ईडीने चौकशीसाठी समन्स बजावले होते. पण ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. तसेच या छापेमारीदरम्यान मुश्रीफ हे नॉट रिचेबल आहेत.

सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याशी निगडीत कर्ज प्रकरणांची ईडीकडून हसन मुश्रीफ यांच्याशी संबंधित ईडीकडून चौकशी सुरु आहे. आतापर्यंत ईडीकडून हसन मुश्रीफ यांचे निवासस्थान, पुण्यातील ब्रिक्स कंपनीशी निगडीत तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, मुलीचे घर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मुख्यालय यावर ईडीने धाड टाकली आहे.

मुश्रीफांना हिशोब द्यावा लागेल : किरीट सोमय्या

हसन मुश्रीफ यांच्या घरी ईडीची छापेमारी झाल्यानंतर किरीट सोमय्या यांनी आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी प्रसार माध्यमाशी बोलताना सोमय्या म्हणाले की, वास्तविकरीत्या ही कारवाई सुरूच आहे. जेव्हा दोन वर्षांपूर्वी मी गणपतीमध्ये कोल्हापूर येथे जाण्यासाठी निघालो होतो, तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी पोलीस बाळाचा वापर करून मला तिथे जाण्यापासून रोखले. तेव्हा मुश्रीफ यांच्या घोटाळ्याबाबत लक्षात आले होते. तर मुश्रीफ यांचा घोटाळा १०० कराडच्या घरात जात आहे आणि त्यामुळे कारवाई तर होणारच अशी माहिती देखील सोमय्या यांच्याकडून देण्यात आली आहे.


हेही वाचा : राहुल गांधींवरील बडबड थांबवा, काँग्रेसचा नितेश राणेंना इशारा