संजय राऊत यांना ईडीचे समन्स!

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले. राऊत यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहचला असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांना सोमवारी सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) समन्स बजावण्यात आले. राऊत यांना मंगळवारी चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ईडी समन्सची माहिती मिळताच संजय राऊत यांनी ट्विट केले. या ट्विटमधून त्यांनी या, मला अटक करा, असे खुले आव्हान दिले आहे. तसेच संजय राऊतांनी हे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केले आहे.

एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांच्या गटासह केलेल्या बंडामुळे शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला असून राज्यात सत्तासंघर्षाची ठिणगी पेटली आहे. ईडीने संजय राऊत यांना समन्स बजावले आहे. पत्राचाळ जमीन घोटाळाप्रकरणी ईडीने हे समन्स बजावल्याची माहिती मिळत आहे.

राऊतांना समन्स कशासाठी?

मुंबईतील गोरेगाव येथील पत्राचाळ जमीनप्रकरणी १ हजार ३४ कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांच्या गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते, मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला असा आरोप आहे.

प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणार्‍या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे ३ हजार घरांचे बांधकाम करायचे काम दिले होते. त्यापैकी ६७२ घरे येथील भाडेकरूंना द्यायची होती. उर्वरित घरे म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती, परंतु २०१०मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे २५८ टक्के शेअर्स एचडीआयएलला विकले. यानंतर २०११, २०१२ आणि २०१३मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खासगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.

मला अटक करा – संजय राऊत

समन्स मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी ट्विट करून म्हटले की, मला आताच समजले ईडीने मला समन्स पाठवले आहे. छान. महाराष्ट्रात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. आम्ही सगळे बाळासाहेबांचे शिवसैनिक मोठ्या लढाईत उतरलो आहोत. मला रोखण्यासाठी हे कारस्थान सुरू आहे. माझी मान कापली तरी मी गुवाहाटीचा मार्ग स्वीकारणार नाही. या…मला अटक करा! जय महाराष्ट्र! शिवाय संजय राऊत यांनी हे ट्विट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनाही टॅग केले आहे.