घरअर्थसंकल्प २०२२Education Budget 2021 : तरुणांसाठी ड्रोन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन हब सुरु करणार, शिक्षण...

Education Budget 2021 : तरुणांसाठी ड्रोन टेक्नॉलॉजी, इनोव्हेशन हब सुरु करणार, शिक्षण क्षेत्रासाठी ठाकरे सरकारच्या मोठ्या घोषणा

Subscribe

राज्यातील तरुणांना आणि युवकांना रोजगार उपलब्ध करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. तसेच तरुणांना संदेशवहन उपग्रहण, ड्रोन टेक्नॉलॉजी जागतिक तंत्रज्ञानाच्या युगात युवकांना संधी मिळावी म्हणून इनोव्हेशन हब उभारण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी विधानसभेत राज्याचा अर्थसंकल्प मांडला यावेळी त्यांनी शिष्यवृत्ती, फेलोशिप तसेच नवीन विद्यापीठ आणि अभ्यासकेंद्र उभारण्यावर भर दिला असल्याचे सांगितले आहे. राज्यात लता मंगेशकर यांच्या नावानं संगीत केंद्र उभारण्यात येणार आहे. यासाठी 100 कोटींची तरतूद करण्यात आली आहे.

राज्याचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिक्षण विभागासाठी 2 हजार 353 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. तर क्रीडा विभागाला 385 कोटी रुपयांची तरतूद कऱण्यात आली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पात शिक्षण विभागात शिष्यवृत्ती, फेलोशिप याद्वारे सर्व विभागांच्या योजना लाभार्थ्यांच्या आधार कार्डशी जोडणार असल्याची घोषणा केली आहे.

- Advertisement -

आधुनिक तंत्रज्ञान केंद्र-महाराष्ट्र हे उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर राज्य आहे. नव्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता,इंटरनेट ऑफ थिंग्ज, फिनटेक, नॅनो व जैवतंत्रज्ञान, ब्लॉक चेन, उद्योग 4.0 व ५.०, संदेश वहन उपग्रह, ड्रोन टेक्नॉलॉजी अशा अनेक अत्याधुनिक नवीन बाबींचा समावेश आहे. जागतिक डिजीटल क्रांतीच्या युगात राज्यातील सुशिक्षित युवक-युवतींच्या कौशल्यात वाढ करुन रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याकरीता राज्यातील प्रत्येक महसुली विभागात एक “ इनोव्हेशन हब ” स्थापन करण्यात येईल. त्याकरीता 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये

11 मार्च 1886 रोजी पेनसिल्वेनिया वुमन्स मेडिकल कॉलेजमधून एम.डी. ही पदव्युत्तर पदवी प्राप्त करणाऱ्या आनंदीबाई जोशी या पहिल्या भारतीय व मराठी महिला डॉक्टर ठरल्या. आज या गोष्टीला 136 वर्षे पूर्ण झाली. त्यांना स्मरुन मी वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाच्या तरतुदी मांडतो.

- Advertisement -

पदव्युत्तर पदवी प्रवेश क्षमतेत वाढ- देशातील होतकरु युवकांना इथेच वैद्यकीय शिक्षणाची संधी मिळावी म्हणून पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश क्षमतेत लक्षणीय वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून मुंबई येथे सेंट जॉर्ज पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था, नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठात वैद्यकीय पदव्युत्तर संस्था तर नागपूर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था स्थापन करण्यात येत आहे. शिवाय पदव्युत्तर अभ्यासक्रमात आधुनिक फिजिओथेरपी तंत्राचा समावेश करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

इंद्रायणी मेडीसीटी- पुणे शहराजवळ 300 एकर जागेमध्ये अत्याधुनिक “इंद्रायणी मेडिसीटी” उभारण्याचा शासनाचा मानस आहे. या वसाहतीत रुग्णालय, वैद्यकीय संशोधन, औषध उत्पादन, वेलनेस, फिजीओथेरपी केंद्र उपलब्ध असतील. सर्व उपचार पद्धती एकाच ठिकाणी उपलब्ध असलेली ही देशातील पहिली वैद्यकीय वसाहत ठरेल.

सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाला 2 हजार 61 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ ही उद्योगांची प्राथमिक गरज असते,हे आपण जाणतोच. मी आता “विकासाची पंचसूत्री” या कार्यक्रमातील “मनुष्यबळ विकास” या तिसऱ्या सूत्राकडे सभागृहाचे लक्ष वेधतो.

मनुष्यबळ विकास

आधार जोडणी-विविध लाभ, सवलतीच्या व शिष्यवृत्तीच्या योजना राज्यातील बालके,विद्यार्थी व अन्य घटकांसाठी राबविण्यात येतात. राज्यातील एकही पात्र लाभार्थी या योजनांच्या लाभापासून वंचित राहू नये, यासाठी आदिवासी विकास, सामाजिक न्याय, इतर मागास बहुजन कल्याण, अल्पसंख्यांक विकास, कौशल्य विकास, शालेय शिक्षण, उच्च व तंत्र शिक्षण तसेच महिला व बालकल्याण विभागाच्या सर्व योजना लाभार्थींच्या आधारक्रमांकाशी जोडण्यात येतील. ही कार्यवाही 1 जून 2022 पूर्वी पूर्ण करण्यात येईल.

कौशल्य विकास

आधुनिक तंत्रज्ञान केंद्र-महाराष्ट्र हे उद्योग व तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रेसर राज्य आहे. नव्याने विकसित होणाऱ्या क्षेत्रांमध्ये संगणक आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता,इंटरनेट ऑफ थिंग्ज, फिनटेक, नॅनो व जैवतंत्रज्ञान, ब्लॉक चेन, उद्योग 4.0 व ५.०, संदेश वहन उपग्रह, ड्रोन टेक्नॉलॉजी अशा अनेक अत्याधुनिक नवीन बाबींचा समावेश आहे. जागतिक डिजीटल क्रांतीच्या युगात राज्यातील सुशिक्षित युवक-युवतींच्या कौशल्यात वाढ करुन रोजगारक्षम मनुष्यबळ निर्माण करण्याकरीता राज्यातील प्रत्येक महसुली विभागात एक “ इनोव्हेशन हब ” स्थापन करण्यात येईल. त्याकरीता 500 कोटी रुपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

गडचिरोली जिल्ह्यात खाजगी सहभागातून कौशल्यवर्धन केंद्र उभारुन दरवर्षी 5 हजार विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण देण्यात येईल. याकरीता शासनाकडून 30 कोटी रुपये उपलब्ध करुन देण्यात येतील व उर्वरित निधी सामुदायिक सामाजिक दायित्व निधीच्या माध्यमातून उभारण्यात येईल.

राज्यात इनोव्हेशन व इन्क्युबेशन इको सिस्टीम-राज्यात इनोव्हेशन व इन्क्युबेशन इको सिस्टीम निर्माण करण्याचा आमचा मानस आहे. तरुणांना विशेष संधी उपलब्ध करून देण्यासाठी नावीन्यपूर्ण संकल्पनेवर आधारीत स्टार्टअपसाठी बीज भांडवल तसेच इन्क्युबेशन सेंटरमार्फत विशेष सुविधा व मार्गदर्शन पुरविण्याचा शासनाचा मानस आहे. स्टार्ट अपसाठी प्रारंभिक टप्प्यातील भांडवल उपलब्ध करुन देण्यासाठी 100 कोटी रुपये रकमेचा राज्य सरकारचा स्टार्ट अप फंड उभारण्यात येत आहे.

सन 2022-23 या वर्षासाठी कार्यक्रम खर्चाकरीता नव्याने नामकरण करण्यात आलेल्या कौशल्य, रोजगार,उद्योजकता व नाविन्यता विकास विभागाला 615 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

उच्च व तंत्र शिक्षण

भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय शासकीय संगीत महाविद्यालय- महाविकास आघाडी सरकारने “भारतरत्न लता दिनानाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय व संग्रहालय” स्थापित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्‍यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कलीना येथील प्रांगणात जागा निश्चित करण्यात आली असून त्यासाठी 100 कोटी रूपये निधी राखून ठेवला आहे.

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर-विकास कामासाठी निधी- कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाला “यशवंतराव चव्हाण ग्रामविकास प्रशाला”, “राजर्षि शाहू महाराज संशोधन केंद्र व संग्रहालय संकुल” तसेच अन्य विभागांच्या आधुनिकीकरणाकरिता 10 कोटी रूपये व मुंबई विद्यापीठाच्या लोकमान्य टिळक रत्नागिरी उपकेंद्रासाठी 2 कोटी रूपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

विद्यापीठांतर्गत अध्यासन केंद्र- राज्यातील विद्यापीठांत थोर समाजसुधारक व महनीय व्यक्तींच्या नांवे अध्यासन केंद्रे स्थापन करण्याबाबत धोरण निश्चित करण्यात आले असून अशा प्रत्येक केंद्रासाठी 3 कोटी रूपये निधी उपलब्ध करुन देण्याचे सरकारने निश्चित केले आहे.

विविध महाविद्यालयांचे नूतनीकरण – मुंबई येथील सिडनहॅम,एल्फिन्स्टन महाविद्यालय आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाकरीता प्रत्येकी 5 कोटी रूपये, औरंगाबाद येथील शासकीय ज्ञान विज्ञान महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त 10 कोटी रूपये, तसेच नागपूर येथील लक्ष्मीनारायण इन्स्टीट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीसाठी 10 कोटी रूपये निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाला 1 हजार 619 कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे.

शालेय शिक्षण

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या कार्यक्रमांतर्गत ऐतिहासिक महत्वाच्या शाळांचा विकास करणे- “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव” या कार्यक्रमांतर्गत राज्यातील महापुरूषांशी संबंधित गावांतील 10 शाळांची निवड करण्यात आली आहे.

(१) महात्मा फुले यांचे मूळगांव खानवडी, ता. पुरंदर, जि. पुणे
(२)राजर्षी शाहू महाराज यांचे जन्मगांव कागल, जि. कोल्हापूर
(३) भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रवेश घेतलेली पहिली शाळा, सातारा
(४) लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे जन्मगांव वाटेगांव, ता. वाळवा, जि.सांगली.
(5) महर्षि धोंडो केशव कर्वे यांचे जन्मगांव- मुरुड, जि. रत्नागिरी.
(६) साने गुरुजी यांचे जन्मगांव पालगड, ता. दापोली, जि. रत्नागिरी.
(७) सावित्रीबाई फुले यांचे जन्मगांव नायगांव, ता. खंडाळा, जि. सातारा
(८) राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे जन्मगांव मोझरी, ता. तिवसा, जि. अमरावती
(9) संत गाडगेबाबा यांचे जन्मगांव शेंडगांव, ता. अंजनगांव सुर्जी, जि. अमरावती.
(१०) क्रांतीसिंह नाना पाटील यांचे मूळगांव येडे मच्छिन्द्र, ता. वाळवा, जि. सांगली.
या गावांतील शाळांना शैक्षणिक सुविधा सुधारणांसाठी प्रत्येकी 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात येईल.


हेही वाचा : Maharashtra Budget 2022 : राज्याचा अर्थसंकल्प विकासाच्या दिशेने टाकलेले पाऊल, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -