मुंबई : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील वाढत्या ओझ्यावरून कायमच प्रश्न उपस्थित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या पाठीवर असणाऱ्या दप्तराचे ओझे कसे कमी होणार? याबाबत अनेकदा चर्चा करण्यात आली. सरकारच्या दरबारी सुद्धा हा प्रश्न मांडण्यात आला. पण अद्याप तरी या प्रश्नावर कोणताही तोडगा काढण्यात आलेला नाही. परंतु, आता विद्यार्थ्यांचे पाठीवरील ओझे कमी नाही तर वाढणार असल्याची माहिती समोर आली आहे. कारण लवकरच नववी आणि दहावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल होणार असून यामुळे विद्यार्थ्यांना अधिकचा अभ्यास करावा लागणार आहे. (Education News Big change in syllabus of class 9th and 10th, burden on students will increase)
नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना सध्या तरी सात ते आठ विषयांचा अभ्यास करावा लागतो. यामध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी या तीन भाषा आणि त्याव्यतिरिक्त विज्ञान, गणित, इतिहास, राज्यशास्त्र, भूगोल, अर्थशास्त्र, शारीरिक शिक्षण इत्यादी विषय आहेत. पण आता यामध्ये व्यावसायिक शिक्षण, कला शिक्षण, अंतर्गत विद्या शाखा विषय यांचा समावेश करण्यात येणार आहे. त्याशिवाय स्काउट गाइडसुद्धा बंधनकारक असणार आहे. ज्यामुळे तब्बल 14 ते 15 विषय विद्यार्थ्यांना अभ्यासाकरिता असणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझ्यासोबतच अभ्यासाचे ओझे देखील वाढणार आहे. या अतिरिक्त विषयांमुळे शाळांच्या वेळाही वाढवण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वेबसाइटवर याबाबतची ब्लू प्रिंट देण्यात आली आहे.
हेही वाचा… BMC : यापुढे धरण प्रकल्पग्रस्तांच्या खापर पणतू आणि पणतीलाही मिळणार नोकरी; पालिकेचा निर्णय
नवीन शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यात येणार असून त्यानुसार, व्यावसायिक शिक्षणामध्ये नववीसाठी विद्यार्थ्यांना शेती, नळ दुरूस्ती, सौंदर्य या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल, तर दहावीला बागकाम, सुतारकाम, परिचर्या या व्यवसायांची ओळख करून देण्यात येईल. कलाशिक्षणात दृश्यकला, नाट्य, संगीत, नृत्य, लोककला या सर्वांची ओळख करून देण्यात येईल. या विषयाला श्रेणी देण्यात येईल. सादरीकरण, शिक्षकांचे निरिक्षण, विद्यार्थ्यांचे स्वयंमूल्यमापन, गट कामगिरी, कल्पकता याआधारे मूल्यमापन करण्यात येईल. हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य विषयांचा ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार केला गेला आहे. आता यासंदर्भात शाळांकडून सूचना आल्यानंतर त्याचा अभ्यास करून हा निर्णय लागू करण्यात येणार आहे.