कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या भोंगळ कारभाराचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराची फक्त 54 टक्के रक्कम जमा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सहा महिन्याहून अधिक काळ मालमत्ता कराची ऑनलाईन यंत्रणा बंद असल्याचा फटका पालिकेला बसला आहे.

कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराची फक्त 54 टक्के रक्कम जमा झाली असल्याची माहिती समोर आली आहे. सहा महिन्याहून अधिक काळ मालमत्ता कराची ऑनलाईन यंत्रणा बंद असल्याचा फटका पालिकेला बसला आहे. यंदा पालिकेच्या तिजोरीत मालमत्ता कराच्या रूपात केवळ 42 कोटी 33 लाख जमा झालेत. मालमत्ता कर भरण्यासाठीची मुदत ३१ मार्च पर्यंत आहे. त्यामुळे नागरिक सध्या पालिकेत कर भरण्यासाठी गर्दी करत आहेत.

मागील वर्षी कुळगाव बदलापूर नगरपालिकेने मालमत्ता करात 5 ते 15 टक्क्यांनी वाढ केली होती. त्यामुळे मालमत्ता कराच्या स्वरूपात पालिकेला मागील वर्षीपेक्षा जास्त रक्कम मिळणे अपेक्षित होते. मात्र पालिकेच्या भोंगळ कारभाराचा परिणाम पालिकेच्या उत्पन्नावर झाला आहे.

हेही वाचा – मुंबईत दहा वाहनतळांमध्ये लवकरच इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग स्टेशन

बदलापूर नगरपालिकेला मुद्रांक शुल्क, जाहिरात, आणि मालमत्ता कर हे तीन उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. यंदा मालमत्ता कराच्या माध्यमातून पालिकेच्या तिजोरीत केवळ 42 कोटी 33 लाख जमा झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर पालिकेची अजून करोडो रुपयांची रक्कम मालमत्ता धारकांकडे थकीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये एमआयडिसीतील एम टेक्स कंपनीकडे 3 कोटी 16 लाख, तर होप इंडिया- कंपनीकडे 2 कोटी 88 लाख इतकी रक्कम थकीत आहे. मात्र एकूण मालमत्ता कराच्या थकीत रकमेचा आकडा किती याची माहिती पालिका अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेली नाही.

तर अद्यापही अनेकांनी मालमत्ता कर भरला नसल्याने शहरातील 200 पेक्षा जास्त मालमत्ता धारकांना पालिकेने जप्तीची नोटीस पाठवली आहे. या मालमत्तेमध्ये शहरातील, गाळेधारक, सदनिका धारक, आणि एमआयडिसीतील कंपन्यांचा समावेश आहे. दरम्यान, या मालमत्ता धारकांनी मालमत्ता कर भरावा आणि जप्तीची कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. दरम्यान, कुळगाव बदलापूर नगरपरिषदेने मालमत्ता करामध्ये वाढ केल्याने नागरिकांनी नाराजी देखील व्यक्त केली होती. पण आता नगरपालिकेने मालमत्ता कर न भरणाऱ्या लोकांना मालमत्ता जप्तीची नोटीस पाठवल्याने लोकांनी कर भरण्यासाठी गर्दी केली आहे.


हेही वाचा – शिंदे गटाने लावलेल्या पोस्टरवर ‘आम्ही सारे सावरकर’ म्हणत संजय राऊतांवर जोरदार टीकास्त्र