मास्क घालणे ऐच्छिक केल्याने मास्क विक्रीवर मोठा फटका

मास्क विक्री ८० टक्क्यांवर घसरली, मास्क विक्री बंद होण्याची शक्यता

Effects on mask sales because of wearing masks not mandatory decision
मास्क घालणे ऐच्छिक केल्याने मास्क विक्रीवर मोठा फटका

मुंबईसह राज्यात कोविड रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाल्याने आणि कोविड संसर्गावर नियंत्रण आल्याने शासनाने व मुंबई महापालिकेने गेल्याच आठवड्यात कडक निर्बंध शिथिल करीत मास्क घालणे ऐच्छिक केले. त्यामुळे आता मास्क घालण्याचे आणि मास्क खरेदीचे प्रमाण कमी झाले आहे. मास्क विक्री थेट ८० टक्क्यांनी घसरून फक्त २० टक्क्यांवर आली आहे. त्यामुळे जर असाच परिणाम होत राहिला तर मास्क विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागेल, अशी भीती मास्क विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

मुंबईत मार्च २०२० पासून कोविडचा संसर्ग सुरू झाला. या संसर्गाचा फैलाव झपाट्याने झाल्याने शासन आणि पालिकेने नाक व तोंड झाकण्यासाठी मास्क घालणे बंधनकारक केले होते. मास्कशिवाय सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या व्यक्तींवर क्लिनअप मार्शलमार्फत प्रत्येकी २०० रुपये याप्रमाणे दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला. त्यामुळे पालिकेकडे कोट्यवधी रुपये जमा झाले. रेल्वे आणि पोलीस यांनीही त्यांच्याकडून मास्क न घालणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला. दंडात्मक कारवाईची रक्कम पाहता नागरिकांनी २० ते ४० रुपये किमतीचे मास्क, अगदी चांगले डिझाईनचे महागडे मास्क खरेदी करणे सुरू केले. त्यामुळे मास्क विक्री करणाऱ्यांचा व्यवसाय तेजीत होता. एक मास्क विक्रेता दिवसाला किमान २५० ते ५०० रुपये कधी कधी त्यापेक्षाही जास्त कमाई करीत असे.

मात्र आता गुढीपाडव्याच्या म्हणजेच हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कोविडचे प्रमाण कमी झाल्याने निर्बंधात शिथिलता आणून मास्क घालणे ऐच्छिक केले. सीएसटी भुयारी मार्गाच्या ठिकाणी मास्क विक्री करणाऱ्यांकडे मास्क विक्रीबाबत विचारणा केली असता, त्यांनी मास्क विक्रीच्या व्यावसायावर मोठा विपरीत परिणाम झाल्याचे सांगितले. पूर्वी १०० टक्के व्यवसाय होत असे. आता ८० टक्क्यांनी व्यवसाय कमी झाला असून फक्त २० टक्के इतकाच व्यवसाय होत आहे. दररोजची १२ तास मास्क विक्रीतून होणारी कमाई घटली आहे. आता दिवसाला ५०० रुपयेसुद्धा मिळत नाहीत. दररोजचा खर्च, पगारपाणी काढण्याइतका व्यवसाय होत नाही. त्यामुळे असाच विपरीत परिणाम सुरू राहण्यास लवकरच आम्हाला मास्क विक्रीचा व्यवसाय बंद करावा लागेल, अशी भीती त्याने व्यक्त केली.


हेही वाचा – Marathi Nameplates on Shops: मुंबईत दुकानांवरील पाट्यांवर मराठीतील अक्षरे मोठ्या फॉन्टमध्ये असणे आवश्यक