पिसाळलेल्या कुत्र्याने आठ मुलांचा घेतला चावा, हातापायांतून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव

कुत्र्याने चावा घेतल्याने मुलांच्या हातापायातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे

परभणीच्या गंगाखेड शहरात एका पिसाळलेल्या कुत्र्याने आठ ते दहा मुलांचे लचके तोडले असल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने या मुलांचा मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला आहे. गंगाखेड शहरातील दस्तगिर मोहल्ला या परिसरात ही घटना घडली असून मुलांना प्राथमिक उपचारांसाठी आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (Eight to ten children are bitten by stray dog)

हेही वाचा “हौसेला मोल नाही!”…..कुत्रा बनण्यासाठी केला तब्बल ११ लाखांचा खर्च

परभणीच्या गंगाखेड शहरात मोकाट कुत्र्यांची संख्या वाढली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या परिसरात कुत्रे पिसाळले आहेत. कुत्र्यांची दहशत पसरली असून नागरिक भयभीत झाले आहेत. त्यातच, आज एका कुत्र्याने तब्बल आठ ते दहा मुलांचा चावा घेतल्याने परिसरात घबराट पसरली आहे. चावा घेतलेल्या मुलांच्या हातापायातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाला.

चावा घेतल्यानंतर या मुलांना प्राथमिक उपचारांसाठी गंगाखेड रुग्णालयात पाठवण्यात आले. तेथे उपचार केल्यानंतर पुढील उपचारांसाठी त्यांना आंबेजोगाई शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. सध्या सर्व जखमी मुलांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. दरम्यान, या कुत्र्यांचा पालिकेने बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आह.