गॅस प्रकल्पासाठी उरण ऐवजी एकलहरे फायदेशीरच !

संघर्ष समितीची भूमिका : सर्व सुविधांयुक्त एकलहरेच्या मंजूर ६६० मेगावॅट प्रकल्पाने शाश्वत वीजपुरवठा

श्रीधर गायधनी । नाशिकरोड

एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती केंद्रातील स्टेज १ च्या बदल्यात मंजूर ६६० मेगावॅट प्रकल्प गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलेला असतांना महानिर्मिती कंपनीकडून उरण येथील गॅस प्रकल्पात नव्याने एक हजार मेगावॅट प्रकल्पावर काम सुरु असून सध्या असलेल्या प्रकल्पाला पूरेसा गॅस पुरवठा होत नसल्याने क्षमतेपेक्षा कमी वीज निर्मिती होत आहे, त्यामुळे नव्या प्रकल्पाचा विचार होण्यापेक्षा मुंबईपासून जवळ असलेल्या व सर्व सोयीसुविधा उपलब्ध असलेल्या एकलहरे प्रकल्पाचा विचार होणे गरजेचे आहे. याबाबत प्रकल्प बचाव संघर्ष समितीने वारंवार पाठपुरावा केलेला आहे.

मुंबईसाठी सध्या पीकटाईमला लागणारी वीजेची मागणी सुमारे २५०० मेगावॅट असून ही गरज २०३० पर्यंत ५००० मेगावॅटपेक्षा अधिक असण्याची शक्यता गृहीत धरून महानिर्मिती कंपनीकडून विविध प्रकल्पावर काम सुरु आहे. मुंबईत असलेला एकमेव उरण गॅस निर्मिती प्रकल्पातील प्रत्येकी १०८ मेगावॅट क्षमता असलेल्या चार संचातून ६७२ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता आहे. मात्र, गॅसच्या पुरवठाच्या प्रश्न नेहमीच भेडसावत असल्याने वीज उत्पादनात घट होत असल्याचे समोर आले आहे. असे असतांना महाविकास आघाडीच्या काळात उरण येथे नव्याने १ हजार मेगावॅट गॅस वीज निर्मिती प्रकल्पासाठी अहवाल सुरु करण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्या प्रमाणे उरणच्या प्रकल्पावर महानिर्मिती कंपनीचे काम सुरु आहे, १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबई अंधारात गेल्यानंतर एकलहरे प्रकल्पातून तातडीने वीजपुरवठा सुरु करण्यात आला होता, महाविकास आघाडीच्या काळात उरण प्रकल्पासह इतर प्रकल्पातून केवळ १३०० मेगावॅट वीजनिर्मिती होत आहे. त्यासाठी नव्याने एक हजार मेगावॅटचा गॅस वीजनिर्मिती प्रकल्प उभारण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. भेलकडून गॅस पुरवठा करण्यात येत असला तरी नियमित मागणीपेक्षा कमी पुरवठा होत आहे. यामुळे मुंबईला जवळ परिपूर्ण सुविधा असलेल्या एकलहरे औष्णिक वीज केंद्र हा सर्वात मोठा व स्वस्त पर्याय असून याठिकाणी स्टेज वनच्या बदल्यात मंजूर असलेला ६६० मेगावॅट प्रकल्प सुरु करणे महानिर्मिती कंपनी व राज्य शासनाला निश्चितच परवडणारा आहे.

महत्वाची कारणे 

  • मुंबईपासून जवळ असलेल्या एकलहरे औष्णिक वीजनिर्मिती प्रकल्पात स्वतःची जागा, इन्फ्रास्ट्रक्चर, मुबलक पाणी आदी सर्व सुविधा उपलब्ध आहे.
  • उरण प्रकल्पामुळे मुंबई उपनगरांत होत असलेल्या प्रदुषणात भर पडण्याची शक्यता असून यामुळे हा प्रकल्प उभारणे शक्य नसल्याचे तज्ञांचे मत आहे.
  • उरण गॅस वीज निर्मिती प्रकल्पाला गॅसची मागणी ३.५ एमएमएससीएमडी असली तरी पुरवठा मात्र १.३ ते सुमारे २ एमएमएससीएमडी च्या दरम्यान होत असल्याने नियोजित १ हजार मेगावॅट गॅस प्रकल्पाचा खर्च वाया जाण्याची भिती आहे.
  • केंद्र सरकारने औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पांबाबत सकारात्मकता दाखवली असून याप्रमाणे एकलहरे प्रकल्प हा मुंबईच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर होऊ शकतो.

प्रकल्पासाठी माजी पालकमंत्री छगन भुजबळ, खा. हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, माजी आमदार योगेश घोलप यांच्यासह आमदार देवयानी फरांदे यांनी प्रयत्न केले आहेत. मात्र, देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी एकलहरे प्रकल्प सुरु करण्याविषयी ठाम भूमिका घेतल्याने देवळाली मतदारसंघाचे, औष्णिक प्रकल्पावर अवलंबून असलेल्या सर्व घटकांना नव्या ६६० मेगावॅट प्रकल्पाची आशा लागून आहे.

पाणी, शेकडो हेक्टर जागा, रेल्वे लाईन, स्ट्रक्चर व सर्व सुविधा असलेल्या एकलहरे प्रकल्पाचा विचार केला तर राज्य शासनाचे हजारो कोटी रुपये वाचतील व मुंबईसाठी सक्षम पर्याय उभा राहील. : शंकरराव धनवटे, अध्यक्ष, प्रकल्प बचाव संघर्ष समिती